मोताळा (जि. बुलडाणा): तालुक्यातील चिंचपूर येथील डेंग्युसदृश तापाने फणफणत असलेले चार रुग्ण बुलडाणा येथील विविध खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. मानसी अनिल मापारी (वय १), प्रीती गणेश गाडेकर (वय ६), प्रतीक्षा नंदकिशोर गवई (वय ६) व गायत्री गजानन मापारी (वय ७) सर्व रा. चिंचपूर असे चार रुग्ण डेंग्युसदृश तापामुळे बुलडाणा येथील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केल्याची माहिती आहे. यातील मानसी अनिल मापारी या मुलीला डॉ. शेवाळे यांच्या दवाखान्यात मागील दोन दिवसांपासून भरती करण्यात आले असून, तिला डेंग्युसदृश ताप असल्याचे निदान झाले. तर उपरोक्त तीन मुलींवर खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. गेल्या नोव्हेंबर महिन्यामध्ये रोहिणखेड येथील एका १५ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर तेथील पाच रुग्ण बुलडाणा येथे भरती करण्यात आले होते, हे विशेष. या पृष्ठभूमीवर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
डेंग्युसदृश तापाचे चार रूग्ण दाखल
By admin | Updated: June 9, 2015 00:18 IST