मानोरा (जि.वाशिम) : तालुक्यातील मौेजे आसोला खुर्द येथील माजी सरपंच भगवान सकरू जाधव (६0) यांना पाच जणांनी जुन्या वादातून जिवे मारण्याच्या हेतूने जबरीने कीटकनाशक पाजले. भगवान जाधव यांच्य मृत्युपूर्व जबानीवरून व पोलीस हेड कॉन्स्टेबल दिलीप नरावडे यांच्या फिर्यादीवरून आरोपी सरपंच भीमराव रामजी राठोड, केशव भीमराव राठोड, अर्जुन भीमराव राठोड, प्रल्हाद सकरू जाधव, भारत सवाई जाधव यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम १४३, १४७, १४९, ३0७, ३0२, ५0४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आले आहे. मानोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे आसोला खुर्द येथील माजी सरपंच भगवान सकरू जाधव यांना ३ ऑगस्ट रोजी ग्राम आसोला खुर्द येथे सकाळी ९ वाजताच्या दरम्यान आरोपी भीमराव रामजी राठोड, केशव भीमराव राठोड, अर्जुन भीमराव राठोड, प्रल्हाद सकरु जाधव, भारत सवाई जाधव यांनी गैरकायद्याची मंडळी जमवून जुन्या भांडणाच्या कारणावरून जिवे मारण्याच्या हेतूने जबरीने कीटकनाशक द्रव्य पाजले. यासंबंधी मृत्यूपूर्व जबानी रिपोर्ट मृतक भगवान जाधव यांनी दिला होता. त्यावरून पोलीस हेडकॉन्स्टेबल दिलीप नरवाडे यांच्या फिर्यादीवरून सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, अकोला येथे जिल्हा शासकीय रुग्णालयात भगवान जाधव हे मरण पावल्याची माहिती मिळाल्याने तसेच एम.ओ. क्युरी अहवाल प्राप्त झाल्यामुळे गुन्हा दाखल करून पोलिसांनी पाचही आरोपीस ताब्यात घेतले. घटनेचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विलास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार मिर्झा हे करीत आहेत. सदर घटनेची माहिती कळताच उपविभागीय अधिकारी देशमुख हे घटनास्थळाला भेट देऊन कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहावी, यासाठी आवाहन करुन परिस्थितीवर दिवसभर नियंत्रण ठेवून होते. पोलिसांनी पाचही आरोपींना ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मृत्युपूर्व जबानीवरून पाच जणांवर गुन्हा
By admin | Updated: August 6, 2015 00:47 IST