सिंदखेडराजा: शासकीय धान्य खरेदी मधून शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची योग्य किंमत मिळावी, हाच उद्देश आहे असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ़ राजेंद्र शिंगणे यांनी येथे केले.
जिजाऊ फार्मर कंपनीच्या माध्यमातून येथे शासकीय धान्य खरेदीचा शुभारंभ डॉ़ शिंगणे यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
सोमवारी सकाळी झालेल्या या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष नाझेर काजी,नगराध्यक्ष सतीश तायडे,प्रांत अधिकारी सुभाष दळवी,तहसीलदार सुनील सावंत,जिजाऊ फार्मर कंपनीचे गजानन पवार,मधुकर गव्हाड, शिवाजी राजे जाधव,राजेंद्र आंभोरे,नगरसेवक विजय तायडे,गणेश झोरे,संदीप मेहेत्रे,सिद्धार्थ जाधव,यासीन शेख आदींची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना डॉ. शिंगणे यांनी फार्मर्स कंपनी असो किंवा शेतकऱ्यांसाठी दुवा म्हणून काम करणाऱ्या कंपन्यांनी शेतकरी हितासाठी काम केले पाहिजे. शेतकऱ्यांनी देखील थेट बाजारात धान्य विकण्यापेक्षा शासकीय योजनेच्या माध्यमातून धान्य विकण्याचे आवाहन त्यांनी केले.
लवकरच शेतकरी भवन
सिंदखेडराजा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी शहरात लवकरच भव्य शेतकरी भवनाची निर्मिती होणार असल्याचे त्यांनी सांगितले़ त्याविषयी शासकीय प्रक्रिया पूर्ण होत आहे. हे काम लवकर मार्गी लागेल़ सध्या धान्य मुबलक झाले आहे , पण साठवणुकीसाठी गोदाम नसल्याने या भागात खासगी कंपन्यांच्या माध्यमातून कृषी माल साठवणुकीसाठी गोदाम तयार करण्यासाठी आपण अनेक कंपन्यांशी संपर्क साधला असल्याचे त्यांनी सांगितले.या संदर्भात देखील शेतकऱ्यांना लवकर दिलासा देण्याचे काम करण्यात येईल असेही ते म्हणाले.