जयदेव वानखडे / जळगाव जामोद
शेतकर्यांनी फेडरेशनला कापूस दिल्यास शासन त्यांना प्रतिक्विंटलप्रमाणे बोनस देणार असल्याचे आश्वासन दिल्यामुळे महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाच्या कापूस खरेदी केंद्रावर कापसाची आवक वाढली असून बोनसच्या प्रतीक्षेपोटी शेतकरी वर्ग आपला कापूस विकण्यासाठी या केंद्रावर धाव घेत आहे. जळगाव जामोदचा परिसर हा कापसासाठी प्रसिध्द असून या परिसरात चांगल्या दर्जाचा कापूस मिळतो व उत्पादनही बर्यापैकी होते. परंतु यावर्षी पावसाने ऐनवेळी फिरवलेली पाठ शेतकर्यांच्या कपाशी उत्पादनात कमालीची घट करून गेली. परंतु काही खरीप तर काही रब्बीचा कापूस शेतकर्यांकडे आहे. अशा परिस्थितीत त्याला भाव नाही तर काय करायचे या विंवचनेत शेतकरी आहे. तेव्हा शासनाने २३ नोव्हेंबरपासून शासकीय पणन महासंघामार्फत कापूस खरेदीचा शुभारंभ केला. सध्या जळगाव जामोद येथे दोन कापूस खरेदी केंद्रे कार्यरत असून त्यापैकी श्री सुपो जिनिंगच्या केंद्रावर महाराष्ट्र राज्य सह. कापूस उत्पादक पणन महासंघाची तर श्री कोटेक्स जिनिंग या केंद्रावर भारतीय कपास निगम (सीसीआय) ची कापूस खरेदी सुरू आहे. *शेतक-यांना स्थानिक बँकेचे धनादेश द्यावे कापसाचे मोजमाप झाल्यानंतर शेतकर्यांना तिसर्या दिवशी कापूस रक्कमेचा धनादेश मिळतो. सदर धनादेश बँक ऑफ इंडियाचा दिला जातो त्या बँकेची शाखा जळगावात नसल्याने तो धनादेश वटविण्यात शेतकर्यांचा आणखी एक आठवडा जातो. त्यामुळे त्यांना हा त्रास होऊ नये याकरिता फेडरेशनने त्यांना स्थानिक सेंट्रल बँक, स्टेट बँक अथवा बँक ऑफ महाराष्ट्र किंवा ग्रामीण क्षेत्रीय बँकेचे धनादेश द्यावेत, अशी मागणी होत आहे.