- संतोष आगलावेलोकमत न्यूज नेटवर्कबोरखेड : कोरोना रुग्णांची वाढतीसंख्या बघता शासनाने सुरू केलेले लॉकडाऊन तसेच आठवडी बाजार बंद करण्याचा निर्णय घेतल्याने टोमॅटोसह भाजीपाल्याचे भाव प्रचंड कोसळले आहेत. तसेच भाजीपाल्याला खरेदीदारही मिळत नसल्यामुळे बोरखेड परिसरातील शेतकऱ्यांनी टोमॅटो रस्त्यावर फेकले आहेत. कोरोनामुळे उद्भवलेल्या बिकट परिस्थितीमुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात अडकला आहे. संग्रामपूर तालुक्यातील बोरखेड, सगोडा, दानापूर, बल्लाडी, वारखेड शिवारात दरवर्षी टोमॅटो, वांगी, मिरची आदी भाजीपाला उत्पादन घेणारे शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत. गत महिन्यापासून पुन्हा आठवडी बाजार बंद करण्यात आल्यामुळे भाजीपाल्याचा उठाव व ग्राहक नसल्यामुळे टोमॅटो, मिरची, वांगी शेतात फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर ओढवली आहे. या भागात वर्षातून दोनदा टोमॅटो पीक घेणारे बरेच शेतकरी आहेत. प्रथम टोमॅटोची लागवड पावसाळ्यात जुलै महिन्यात करण्यात येते. सप्टेंबर महिन्यात शेवटी काढणीस सुरुवात होते. त्यावेळेस सहाशे ते सातशे रुपयांच्या वर एका टोमॅटो कॅरेटला भाव मिळतो. शेतकरी दुसऱ्यांदा टोमॅटो पेरणी जानेवारी महिन्यात करतात. मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून टोमॅटो निघण्यास सुरुवात होते. परिणामी कोरोनाच्या संकटामुळे टोमॅटो प्रति शंभर रुपये कॅरेट या दराने सुद्धा व्यापारी खरेदी करण्यास असमर्थता दर्शवितात. शासनाने भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी नुकसानग्रस्त भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांकडून केली जात आहे. भाजीपाला पीक उत्पादन घेण्यासाठी केलेला खर्च शेतकऱ्यांनी व्याजाने व उसनवारीने आणल्यामुळे तो कसा फेडायचा तसेच मुला- मुलीचे लग्न, शिक्षण आजारपणासाठी पैसे कोठून आणायचे, या चिंतेत भाजीपाला उत्पादक शेतकरी सापडला आहे. शासनाने त्वरित आर्थिक मदत देण्याची मागणी भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
एका एकराला ४० हजार रुपये खर्च टोमॅटोचे एका एकरातील सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण पीक निघण्याकरिता कमीत कमी एकरी चाळीस हजार रुपये खर्च येतो. अशा बिकट परिस्थितीमुळे शेतकऱ्यांनी शेतातील टोमॅटो गुरांना रस्त्यावर टाकून चारणे चालू केले आहे. अनेक शेतकऱ्यांनी लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
मी जानेवारी महिन्यात दोन एकरात टोमॅटो पिकाची लागवड केली. जेमतेम सत्तर हजार रुपये खर्च आला; मात्र आज रोजी टोमॅटोला योग्य भाव नसून खरेदीदार मिळत नसल्यामुळे टोमॅटो तोडणे बंद केले. - गोपाल बोरसे. टोमॅटो उत्पादक शेतकरी. दानापूर