लोणार : तालुक्यात शासनाचा महसूल बुडवून तालुक्यात ई-क्लास जमिनीवरील अवैधरीत्या गौण खनिज उत्खनन जोमात सुरू असल्याचे चित्र आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे़
शासनाचा महसूल चुकवून किनगाव जट्टू, लोणार, सुलतानपूर परिसरात ई-क्लास जमिनीवरील सुरू असलेल्या बेकायदेशीर उत्तखननाकडे महसूल कर्मचारी व मंडळ अधिकारी यांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे शासनाचा लाखो रुपायांचा कर बुडवून बेकायदेशीर गौण खनिजाची लूट करणाऱ्यावर कारवाई करण्याची गरज आहे़ महसूल बुडवण्यासाठी सुटीच्या दिवशी किंवा मध्यरात्री व पहाटेची वेळ साधून गौण खनिजाची लूट करण्याची शक्कल लढविली जाते. त्यामुळे ई-क्लास जमिनीची अक्षरश: चाळण झाल्याचे दिसून येते. महसूल कर्मचारी व मंडळ अधिकारी यांचे चोरट्या गौण खनिज वाहतुकीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. महसूल विभागाविषयी तीव्र नाराजी ग्रामस्था मध्ये दिसून येत आहे. महसूल विभागाने याकडे लक्ष घालून बेकायदेशीर सुरू असलेल्या अवैध गौण खनिज उत्खननाला आळा घालावा, अशी मागणी हाेत आहे़ राॅयल्टी १० ब्रासची व उत्खनन ५० ते ६० ब्रास. असा प्रकार सध्या सुरू असून याला महसूल कर्मचारी यांचे पाठबळ मिळत आहे. बहुतांशी विना परवानाच गौण खनिज उत्खनन सुरू असल्याचे निर्देशनास येत आहे.