खामगाव : शैक्षणिक सत्र २0१५-१६ करिता इयत्ता पाचवीच्या सेमी इंग्रजी माध्यमाच्या अभ्यासक्रमाचे विज्ञान विषयाचे पुस्तक चक्क मराठीतून मिळाल्याने विद्यार्थी, पालक आणि शिक्षकही चक्रावून गेले आहेत. गेल्या अभ्यासक्रमात हेच पुस्तक इंग्रजीतून देण्यात आले होते; परंतु यंदा मराठीतून पुस्तक आल्याने सेमी इंग्रजी माध्यमाबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. अनेक शासकीय आणि खासगी शाळांमध्ये सेमी इंग्रजीच्या अभ्यासक्रमाला शासनाने मान्यता दिली. गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासनाने पहिली ते आठवीपर्यंत मोफत शालेय पुस्तके देण्याचा निर्णयही घेतला आहे. त्यानुसार विविध शाळांतील विद्यार्थ्यांंना मोफत पाठय़पुस्तके वितरित केली जातात. गेल्या वर्षापर्यंत सेमी इंग्रजी माध्यमाच्या इयत्ता पाचवीच्या अभ्यासक्रमात गणित आणि विज्ञान हे दोन विषय इंग्रजीतून शिकविले जात होते. यावर्षी मात्र सेमी इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांंना केवळ गणित या विषयाचे पुस्तकच इंग्रजीतून देण्यात आले, तर विज्ञान विषयाची भाषा मराठी आहे.
*पुस्तके वितरणानंतर निदर्शनास आली बाब!
सर्व शिक्षा अभियानांतर्गत इयत्ता पहिली ते आठवीपर्यंंतच्या सर्व विद्यार्थ्यांंना मोफत शालेय पाठय़पुस्तके वितरित करण्यात आली आहेत. शालेय सत्राला सुरुवात झाल्यानंतर विद्यार्थ्यांंना पुस्तके देण्यात आली. यामध्ये इयत्ता पाचवीचे विज्ञान विषयाचे पुस्तक मराठीतून मिळाल्यानंतर ही धक्कादायक बाब उघडकीस आली.