अकोला - सिटी कोतवाली पोलीस स्टेशनजवळून हाकेच्या अंतरावर असलेल्या गांधी रोडवरील स्वामी संकुलमधील आठ दुकाने अज्ञात चोरट्यांनी फोडल्याची घटना शनिवारी मध्यरात्री घडली. मात्र वेळीच पोलीस पोहोचल्याने दुकानातील एक रुपयाचाही मुद्देमाल लंपास झाला नाही. कोतवाली पोलिसांच्या सतर्कतेमुळे चोरट्यांचा चोरीचा प्रयत्न फसला.स्वामी संकुलमध्ये असलेल्या हाने सटी गारमेंट, अविनाश एंटरप्राइजेस, नारायण इलेक्ट्रॉनिक्स, करण ज्वेलर्स, फॅशन क्रेज, न्यू मीलन गारमेंटस, मीलन गारमेंटस आणि विदर्भ वाईन बारचे लोखंडी शटर अज्ञात चोरट्यांनी शनिवारी रात्री १ वाजताच्या सुमारास तोडले. त्यानंतर या आठही दुकानातील मुद्देमाल लंपास करण्याच्या हालचाली सुरू असतानाच यावेळी रात्र गस्तीवर असलेले सिटी कोतवाली पोलिसांचे वाहन पोहोचल्याने चोरटे चोरी करण्याआधीच घटनास्थळावरून पसार झाले. सिटी कोतवाली पोलिसांना व या परिसरातील सुरक्षा रक्षकांना स्वामी संकुलमध्ये चोरट्यांच्या हालचाली सुरू असल्याचा संशय आल्याने त्यांनी बॅटरीद्वारे उजेड पाडून परिस्थितीची माहिती घेतली. मात्र, तोपर्यंंत चोरटे घटनास्थळावरून पसार झाले होते. पोलिसांनी रात्री घटनास्थळ गाठून आठही दुकानांची तपासणी केली. मात्र एकाही दुकानात चोरी झाली नसल्याचे उघड झाले. त्यानंतर उशिरा रात्री या दुकानाचे संचालक आल्यानंतर माहिती घेतली असता, या दुकानांमध्ये चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. मात्र, त्यांचा चोरीचा प्रयत्न अपयशी ठरल्याचे उघड झाले.
गांधी रोडवरील आठ दुकाने फोडली
By admin | Updated: July 18, 2016 02:11 IST