बुलडाणा : दिवाळी, ईद यांसारख्या सणापूर्वी कर्मचार्यांना अग्रिम वेतन देण्यात येत असते; मात्र जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या दुर्लक्षामुळे जिल्ह्यातील उर्दू शिक्षक वेतनापासून वंचित आहेत. त्यामुळे रमजान ईद सणाच्या पूर्वसंध्येला त्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. बुलडाणा जिल्हा परिषद अंतर्गत एकूण ७ हजार १३८ शिक्षक कार्यरत आहेत. त्यांना प्रत्येक महिन्यात २७ कोटी रुपये वेतन देण्यात येते, तर ईद-दिवाळी सणासाठी एक-दोन महिन्यांपूर्वी वेतन देण्याचे नियोजन करण्यात येते. त्यामुळे सण-उत्सवादरम्यान विविध साहित्य खरेदीसंबंधी अडचणी येत नाहीत. यावर्षी रमजान महिना सुरू होण्यापूर्वी महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटनेने निवेदन देऊन जून महिन्याचे वेतन तसेच जुलै २0१४ ते जानेवारी २0१५ दरम्यानचा महागाई भत्ता ईद सणापूर्वी १३ जुलै रोजी वितरित करावा, अशी मागणी केली होती; मात्र १३ पंचायती समित्यांपैकी फक्त ११ समित्यांची वेतन बिले जिल्हा परिषद शिक्षण विभागाला मिळाली आहेत. खामगाव व नांदुरा पंचायत समितीचे वेतन बिले अप्राप्त आहेत. वेतन बिले वेळेवर न मिळाल्यामुळे जिल्हा कोशागार कार्यालयात बिले उशिरा टाकण्यात आली. त्यामुळे बुलडाणा, मोताळा, मलकापूर, जळगाव जामोद, संग्रामपूर, शेगाव, चिखली, मेहकर, लोणार, देऊळगावराजा व सिंदखेड राजा या ११ पंचायत समित्यांचे २३ कोटी ७९ लाख रुपये वेतन जिल्हा कोशागार अधिकारी कार्यालयात पाठविण्यात आले आहे. तथापि, पैसे बँकेत जमा होण्यासाठी कमीत कमी चार दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे उर्दू शिक्षक सध्या ईदनिमित्त साहित्याची खरेदी उधारीवर करीत आहेत. यास जबाबदार अधिकार्यांवर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र उर्दू शिक्षक संघटनेचे अमरावती विभागीय अध्यक्ष वासिक नवेद आदींनी केली आहे. *पंचायत समितीकडे देयके पाठविली मुख्य सणासठी कमीत कमी पाच हजार रूपये अग्रिम वेतन देण्यात येते. रमजान ईदसाठीही अग्रिम वेतन म्हणून २७ लाख १७ हजार रूपयांची देयके मंजूर करून संबंधित पंचायत समितीला पाठविण्यात आले आहे. त्यामुळे उर्दू शिक्षकांना एक-दोन दिवसांत अग्रिम वेतन मिळण्याची शक्यता आहे. तोपर्यंंत मात्र ईदचा सण निघून जातो. त्यानंतर मिळालेल्या अग्रिम वेतनाचा काहीच फायदा होणार नाही. याबाबत उर्दू शिक्षकांमध्ये रोष आहे.
पगाराविना होणार उर्दू शिक्षकांची ईद
By admin | Updated: July 15, 2015 23:18 IST