खामगाव : ढगाळ वातावरण आणि आतमधील जंगलात नैसिर्गक पाण्याचे स्त्रोत असल्याने मचाण बांधलेल्या अनेक पाणवठय़ांवर प्राणी फिरकलेच नसल्याने ज्ञानगंगा अभयारण्यात गणणेसाठी गेलेल्या निसर्गप्रेमींच्या कुतूहालावर विरजण पडले. तरीही दिवसा उजेडी दिसलेल्या प्राण्यांमध्ये निलगायींची व हरणांची संख्या लक्षणीय होती. वनविभाग प्रादेशिक व वन्यजीव (अकोला) यांच्या अधिकारी कर्मचार्यांसह निसर्गप्रेमींच्या सहकार्याने बुध्द पौर्णिमेच्या रात्री सोमवारी ४ मे रोजी ज्ञानगंगा अभयारण्यात वन्यजीव गणना करण्यात आली. यात उपवनसंरक्षक (वन्यजीव) विजय गोडबोले, वनपरिक्षेत्र अधिकारी जी.एम.भगत, मानद वन्यजीव रक्षक मंजितसिंग शीख व देवेंद्र तेलकर यांच्या निर्देशनात विविध भागात निसर्गप्रेमींनी निरीक्षणासाठी पाठविण्यत आले होते. सायंकाळ नंतर रात्री १२ वाजेपर्यंंत अनेकवेळा ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने चंद्राचा पुरेसा प्रकाश न पडल्याने पाणवठय़ावर आलेले प्राणी दिसू शकले नाहीत. तर यावर्षी अवकाळी पावसामुळे जंगलात अनेक ठिकाणी पाणी उपलब्ध झालेले आहे. या कारणानेही कृत्रिम पाणवठय़ावर येणार्या प्राण्यांची संख्या कमी होती. त्यामुळे निसर्गप्रेमींची निराशा झाली. सायंकाळ पुर्वी तसेच पहाटेच्या वेळी मात्र नीलगायी, हरण, चिंकारा, साळिंदर, ससे, मोर, लांडोर, गुरुड, घार, हरियल यांचे दर्शन झाले. वन्यजीव विभागाचे लिपीक नवृत्ती गोरे यांनी लोकमतला माहिती दिल्याप्रमाणे गणनेत आढळलेल्या वन्यजीवांमधये बिबट ३, अस्वल २१, रानडुक्कर १६८, सायळ ८, ससा ५, भेडकी ४१, नीलगाय २६५, मोर लांडोर १३५, चिंकारा ४, राममांजर ३, माकड १८१, तडस ७, चौशिंगा १, लांडगा ६, उद १, सांबर ४ या प्राण्यांची नोंद या वन्यप्राणी गणनेचेवेळी करण्यात आली आहे.
ढगाळ वातावरणाने वन्यजीव गणनेवर विरजण
By admin | Updated: May 6, 2015 00:40 IST