बुलडाणा: राज्यातील दुष्काळ निवारणासाठी केंद्र सरकारचा निधी जाहीर झाला आहे. सरकारने महाराष्ट्रासाठी ३१00 कोटी रुपयांचे पॅकेज मंजूर केले आहे. यापैकी प्रत्येक जिल्ह्याची मागणी लक्षात घेता बुलडाण्याला पहिल्या टप्प्यात २00 कोटींची रक्कम मिळण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील दुष्काळाबाबत केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह, अर्थमंत्री अरुण जेटली आणि गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्यात महत्त्वाची बैठक पार पडली. त्यात महाराष्ट्राला ३१00 कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय झाला. बुलडाणा जिल्ह्यात तिसर्या वर्षी दुष्काळसदृश स्थितीचा फटका बसला आहे. दुष्काळाबाबत तलाठी, महसूल विभाग, नजर आणेवारी, सुधारित आणवारी, केंद्रीय पथकाची पाहणी असा शासकीय सोपस्कार पार पडला असून, सर्व अहवाल पाहता जिल्ह्याला किमान ४00 कोटींची गरज भासणार आहे. बागायती क्षेत्राची झालेली हानी लक्षात घेता मदतीचा हाच आकडा ५५0 कोटींच्या घरात जातो त्यामुळे किमान जिरायती शेतीला प्राधान्य देत मदत घोषित झाली तर ४00 कोटींपैकी पहिल्या टप्प्यात किमान २00 कोटींची मदत मिळणे अपेक्षित आहे. जिल्हाभरात पैसेवारी ही अवघी ३३ पैसे आली होती. त्यामुळे सात नोव्हेंबरला जिल्ह्यातील १४२0 गावे दुष्काळसदृश घोषित केली होती. जिल्ह्यातील दुष्काळाची दाहकता प्रत्यक्ष पाहण्यासाठी केंद्राचे हे पथक जिल्ह्यात दाखल झाले होते. त्यामुळे या पथकाच्या अहवालावर जिल्ह्याची दुष्काळी मदत अवलंबून राहिली आहे.
दुष्काळी मदतीसाठी मिळू शकतात २00 कोटी
By admin | Updated: December 30, 2015 01:51 IST