जऊळका (जि. बुलडाणा): नापिकीचे पैसे शेतकर्यांना वाटप केल्याचे शासन स्तरावरून सांगितल्या जाते खरे; परंतु कित्येक शेतकर्यांना दुष्काळाचे अनुदान अद्याप मिळालेले नाही. यामुळे जऊळका, पिंपळगाव कुडा, ताडशिवणी, लिंगा या ठिकाणचे शेतकरी स्टेट बँक दुसरबीड, तलाठी, तहसील कार्यालय या ठिकाणी चकरा मारून त्रस्त आहेत. याकडे वरिष्ठांनी लक्ष द्यावे, अशी मागणी आहे. दुष्काळग्रस्त शेतकर्यांना शासनातर्फे अनुदानाचे वाटप करण्यात आले. हे अनुदान वाटप करताना अनुदानाची रक्कम शेतकर्यांच्या खात्यात जमा करण्यात आली. त्यासाठी शेतकरी वर्गाकडून बँक खाते क्रमांक मागितले होते. त्यानुसार सर्व शेतकरी वर्गाने आपापले बँक खाते क्रमांक तलाठी यांचेकडे दिले, तरीही कित्येक शेतकर्यांच्या खात्यात अनुदान जमा झालेले नाही. त्यासाठी वरिष्ठ स्तरावरून लक्ष देऊन शेतकर्यांच्या खात्यात अनुदान जमा करण्याची मागणी दत्ता नागरे, शिवहरी नागरे, सचिन नागरे, राजेश नागरे, भगवान मुंढे, शिवानंद मुंढे, पांडुरंग जायभाये, गजानन जायभाये अशा अनेक शेतकर्यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे. निवेदन देताना अनेकांची उपस्थिती होती.
दुष्काळग्रस्त शेतकरी अनुदानापासून वंचित
By admin | Updated: May 3, 2016 02:08 IST