खामगाव: मतदारांना खोटी आश्वासने देऊन केंद्रात व राज्यात भाजपा प्रणीत शासनाने सत्ता काबीज केली. निवडणूकपूर्व दिलेले एकही आश्वासन पूर्ण करण्यास शासन अपयशी ठरले आहे. नैसर्गिक आपत्तीने शेतकरी, शेतमजूर, सामान्य नागरिकांचे जगणे कठीण होत आहे. अशा परिस्थितीत शासनाने जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित केला आहे. दुष्काळाच्या निकषामध्ये शेतसारा माफ करण्यात येणार असल्याने शेतकर्यांचे भले होणार नाही तर शेतकर्यांना हेक्टरी ५0 हजार रुपये मदत करून शेतकर्यांचा सातबारा कोरा करा अन्यथा शासनाविरुद्ध आंदोलने सुरूच राहतील, असा इशारा भारिप-बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष अशोक सोनोने यांनी दिला. बुलडाणा जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकर्यांचा सातबारा कोरा करावा, शेतकर्यांसाठी डॉ. स्वामीनाथन आयोग लागू करा, आरक्षणाविषयी चालू असलेल्या चर्चांंना पूर्णविराम देऊन आरक्षण कायम ठेवण्यात यावे, खासगी क्षेत्रात आरक्षण लागू करण्यात यावे, वाढलेली महागाई कमी करण्यात यावी, चारा डेपो सुरू करावे, खामगाव जिल्हा व लाखनवाडा तालुका जाहीर करावा या व इतर मागण्यांसाठी गुरुवारी भारिप-बहुजन महासंघाच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयावर प्रचंड मोर्चा काढण्यात आला.
शेतसारा नव्हे सातबारा कोरा करा- सोनोने
By admin | Updated: November 20, 2015 02:18 IST