चिखलीसाठी ऑक्सिजन सिलिंडर नसल्याने कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना प्राणवायूचा पुरवठा होणार नाही, अशी माहिती आ.श्वेता महाले यांना प्रशासनाकडून मिळाली. या बाबीची गंभीरतेने दखल घेत आ.महाले यांनी बीड, जालना व राज्यातील इतर ठिकाणी असलेल्या ऑक्सिजन प्लांटशी संपर्क साधून चिखली शहरात एकही सिलिंडर नसल्याने अनेक रुग्णांचा जीव धोक्यात आल्याची बाब निदर्शनास आणून दिली. ऑक्सिजन प्लांटवाल्यांनी त्यांच्या जिल्ह्यातच ऑक्सिजनचा पुरवठा होत नसल्याने त्यांनी सिलिंडर देण्यास असमर्थता दर्शविली; परंतु बीड आणि जालना येथून ऑक्सिजन सिलिंडर देण्याचे आश्वासन तेथील प्लांटने दिले. मात्र, त्यासाठी त्यांनी तहसीलदार व जिल्हाधिकारी यांच्या पत्राची मागणी केली. याअनुषंगाने आ. महाले यांनी चिखलीत ऑक्सिजन पुरवठा नोडल अधिकारी भूषण अहिरे व तहसीलदार डॉ. अजितकुमार येळे यांच्याशी चर्चा केली असता संबंधित अधिकारी वर्गानेही पत्र देण्याची हमी दिली. सोबतच उपजिल्हाधिकारी भूषण अहिरे यांनी आ. महाले यांच्याकडे बुलडाणा शहरातसुद्धा ऑक्सिजन सिलिंडरचा तुटवडा असल्याचे सांगून बुलडाणा शहरासाठी सुद्धा ऑक्सिजन सिलिंडर मिळवून देण्याची मागणी केली. त्यांच्या मागणीप्रमाणे आ. महाले यांनी बीड व जालना येथील प्लांट व्यवस्थापनाशी विनंती करून बुलडाणा शहरासाठीसुद्धा सिलिंडर देण्याची मागणी केली. मागणीवरून सिलिंडर देण्याचे कबूल केले. उपजिल्हाधिकारी अहिरे व तहसीलदार चिखली यांनी तातडीने पत्र देऊन बीड व जालना येथे गाडी पाठवली. त्यामुळे ठरल्याप्रमाणे बुलडाणा येथे ४५ तर चिखली येथे ४० ऑक्सिजन सिलिंडर्स प्राप्त झाले आहेत. याव्दारे दोन दिवसांचा साठा उपलब्ध झाला असून रुग्णांसह डॉक्टरांनीसुद्धा सुटकेचा नि:श्वास सोडला.
व्यवस्थेतपण प्राण फुंकण्याची गरज : आ. महाले
शासनाच्या नाकर्तेपणामुळे राज्यातील नागरिकांचा जीवन-मरणाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. परंतु सरकारचे अपयश समोर आणणाऱ्या विरोधी पक्षालाच टार्गेट करून प्रत्येक गोष्टीकरिता केंद्राकडे बोट दाखवून आपला निष्क्रिय कारभार झाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. स्वत:ही करायचे नाही आणि इतरांनाही प्रयत्न करून परिस्थिती सुधारू द्यायची नाही. चुका दाखविल्यास त्यांनाच टार्गेट करायचे, असा प्रकार सत्ताधारी करीत आहेत. सर्व व्यवस्था खिळखिळी झालेली असून, रुग्णांना तर प्राणवायू हवाच, सद्य:स्थितीत असणाऱ्या व्यवस्थेतही प्राण फुंकण्याची गरज असल्याची घणाघाती टीका आ. श्वेता महाले यांनी यावेळी केली.