हर्षनंदन वाघ बुलडाणा, दि. २६- प्रत्येक घरासमोर स्वच्छता करून ठिकठिकाणी काढण्यात आलेली स्वागताची रांगोळी.. डफाच्या तालावर खेळण्यात येत असलेली लेजीमची प्रात्यक्षिके.. विविध महापुरुषांच्या वेशभूषेत असलेले विद्यार्थी.. झाडे वाचवा, झाडे जगवा, गं्रथ हेच गुरू तसेच बेटी बचाओचा संदेश देणारी फलके.. तसेच पारंपरिक बंजारा वेशभूषेत नृत्य सादर करणारी बालिका व महिला.. अशाप्रकारे ग्रामीण संस्कृतीचे वैभव दर्शविणारी ग्रंथ दिंडी एक दिवसीय बुलडाणा जिल्हा मराठी संमेलनाचे आकर्षण ठरले.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ नागपूर व विदर्भ साहित्य संघ शाखा बुलडाणा यांच्या संयुक्त विद्यमाने श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ शेलसूरच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने राजमाता जिजाऊ साहित्य नगरीत स्व. माधवराव देशमुख माध्यमिक आश्रमशाळा करवंड ता. चिखली येथे २६ मार्च रोजी एक दिवसीय बुलडाणा जिल्हा मराठी संमेलनानिमित्त करवंड या गावात ग्रंथ दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या दिंडीत संमेलनाचे अध्यक्ष डॉ. गणेश गायकवाड, उद्घाटक श्रीपाद भालचंद्र जोशी, प्रमुख अतिथी डॉ.विलास देशपांडे, स्वागताध्यक्ष सुनील देशमुख, नरेंद्र लांजेवार, प्रा.डॉ. अनंत सिरसाट, प्रा.डॉ. गोविंद गायकी, प्रा. निशिकांत ढवळे, मुख्याध्यापक एस.टी. रिंढे, सुरेश साबळे, अनिल अंजनकर, गो.या. सावजी, सुदाम खरे, विनोद देशमुख, प्रेशित सिद्धभट्टी, डॉ. इंदुमती लहाने, अँड. जयश्री शेळके, वंदना ढवळे, प्रा.डॉ. संगीता पवार, मैत्री लांजेवार, गणेश निकम केळवदकर, रणजित राजपूत, रविकिरण टाकळकर, जादूगार डी. चंद्रकांत, अर्जुन सातपुते, सुभाष किन्होळकर यांच्यासह मान्यवर साहित्यिक, लेखक, शिक्षक मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. पालखीत संविधान, संत तुकारामाची गाथा, एकनाथी भागवत व ग्रामगीता हे ग्रंथ होते. यावेळी गावातील महिलांनी ठिकठिकाणी ग्रंथ पूजन केले. तसेच ठिकठिकाणी स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या. या गं्रथ दिंडीमुळे करवंड गावात उत्साहाचे वातावरण दिसून येत होते.
ग्रामीण संस्कृतीचे वैभव दर्शविणारी ग्रंथ दिंडी
By admin | Updated: March 27, 2017 02:28 IST