धाड : ग्रामीण भागात कोरोनाचा कहर वाढतच चालला आहे.
अगदी गावखेड्यांत कोरोनाबाधितांची संख्या लक्षणीय आहे़ यामध्ये अनेकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर असंख्य गोरगरीब रुग्णांना महागड्या उपचारांसाठी पैशांची जुळवाजुळव करताना कसरत करावी लागत आहे़ आवश्यक औषधोपचार पैसा असूनही मिळेनासा झाल्याने अनेकांना आपल्या प्राणास मुकावे लागत असल्याचे वास्तव आहे.
सध्या कडक निर्बंध सुरू आहेत़़ प्रशासनाने जीवनावश्यक वस्तू विक्री व्यवसायांना ठरावीक वेळ निर्धारित करून दिली आहे.
त्यामुळे गोरगरिबांना रोजगार आणि रोजची पोट भरण्याची तरतूद कशी करावी, याचा प्रश्न भीषण झाला आहे. असंख्य ग्रामीण खेड्यांतील वयोवृद्ध नागरिकांना शासनाकडून देण्यात येणाऱ्या श्रावण बाळ, संजय गांधी निराधार, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ पेन्शन योजना, विधवा, अपंगांना प्रतिमाह तुटपुंजे मानधन देण्यात येते, या गंभीर परिस्थितीत महसूल विभागाने मागील तीन महिन्यांपासून या योजनेतील गरजू लाभार्थ्यांना दिले नसल्याने अनेक आधारहीन वयोवृद्ध नागरिकांना उपासमारीची वेळ येऊन ठेपली असून, महसूल विभागाने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे.
एकीकडे कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत झाले असताना ग्रामीण भागातील वयोवृद्ध गोरगरीब नागरिकांना आपल्या तुटपुंज्या शासकीय मानधनाशिवाय आधार नसल्यामुळे त्यांची परवड होत आहे.
गावागावांत वयोवृद्ध नागरिकांकडे या कोरोनाच्या काळात होणारे दुर्लक्ष घातक ठरत आहे़ दररोज येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेत असंख्य ज्येष्ठ नागरिक व महिला आपल्या ताेकड्या मानधनाची प्रतीक्षा करत आहेत. रोजच्या रोज बँकेत चौकशी करून वयोवृद्ध नागरिक निराश होऊन परत जात आहेत. या वृद्धांना आधार देणारा असताना मात्र मागील तीन महिन्यांपासून आपल्या हक्काच्या मानधनापासून ज्येष्ठ नागरिक वंचित असल्याने वयोवृद्ध नागरिक व महिला आणि इतर गरजू लाभार्थी सध्या हैराण झाले आहेत.
महसूल विभागाने याकडे तातडीने लक्ष घालून वेळीच विविध योजनांतील गरजू लाभार्थ्यांना थांबलेले त्यांचे मानधन देण्याची मागणी जनतेतून समोर येत आहे.
कोरोनाच्या या आपत्ती काळात महसूल विभागाने वेळीच तातडीने युद्धस्तरावर उपाययोजना करून गरजू लाभार्थ्यांना त्यांचे मानधन दोन दिवसांत वितरित करावे, अन्यथा शिवसेना व युवासेना बुलडाणा तालुक्याच्या वतीने जनआंदोलन छेडण्याचा इशारा युवासेना व शिवसेनेच्या वतीने देण्यात आला आहे.
बबलू वाघुर्डे, तालुकाप्रमुख, युवासेना, शिवसेना
बुलडाणा...