देऊळगांव कुडपाळ : जगप्रसिद्ध लोणार सरोवरापासून जवळच असलेला देऊळगांव कुंडपाळ सिंचन प्रकल्प दमदार पावसाने १०० टक्के भरला आहे. आणखीही पाऊस पडल्यास सिंचन विभागाने ग्रामपंचायतीस पत्र देऊन नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्याचे निर्देशित केलेले आहे. प्रकल्पावरून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
देऊळगांव कुंडपाळ हद्दीत सन २००९ मध्ये निर्माण झालेला २.४०८ द.घ.मि. एवढा साठाक्षमता व ४२५ हेक्टरसिंचन क्षमता असलेला हा प्रकल्प यापूर्वी दिनांक ३० ऑगस्ट, २०१०, २३ जुलै, २०१२, १७ ऑगस्ट, २०२० आणि ८ सप्टेंबर, २०२१ रोजी १०० टक्के भरला होता. या प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्यात आले हाेते. त्यामुळे सिंचनासाठी पाणी कमी मिळाले हाेते. या वर्षी प्रकल्प शंभर टक्के भरला असल्याने पेयजलाचा व थोड्या-फार रब्बी सिंचनाचा प्रश्न मार्गी लागला आहे.
धरणाच्या भिंतीवर वन्य प्राण्याचे बिळ
देऊळगांव कुडपाळ धरणाच्या भिंतीवर वन्य प्राण्याने बिळ तयार करून भिंत पोखरली आहे. तडे गेलेले असल्याने आणि भीतीवर मोठमोठी वृक्ष, झुडपे वाढलेली असल्याने, धरण फुटण्याचा धोका असल्याचे पत्र २३ जून, २०२१ रोजी सरपंच शेषराव डोंगरे आणि ग्रामसेवक लक्ष्मण जायभाये यांचे संयुक्त स्वाक्षरीने पाटबंधारे विभागास देण्यात आले आहे. त्या पत्रास पाटबंधारे विभागाने केराची टोपली दाखविली आहे, तसेच प्रकल्प शंभर टक्के भरल्याने पूर येण्याची शक्यता पाहता, नदी काठावरील ग्रामस्थांना सतर्क करण्याची सूचना ग्रामपंचायतीला केली.
पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटला
देऊळगांव कुडपाळ प्रकल्प १०० टक्के भरल्याने परिसरातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे, तसेच रब्बीसाठी या प्रकल्पाचे पाणी मिळणार असल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. या प्रकल्पावर ४२५ हेक्टरवर सिंचन करण्यात येते.