कोयाळी दहातोंडे (लोणार, जि. बुलडाणा) : लोणार तालुक्यातील मातमळ येथे साथीचे आजार वाढले आहे. येथे डेंग्यूसदृश तापाची लागण पाच चिमुकल्यांना झाली असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हिरडव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणार्या मातकळ येथे सध्या मलेरिया, सर्दी, खोकला, ताप यासारख्या विविध आजाराने थैमान घातले आहे. अशातच येथील करण गजानन शिंदे (१0), छकुली गजानन शिंदे (६), संकेत पंढरी शिंदे (९), अक्षरा राजेश मापारी (७), ज्ञानेश्वर विठ्ठल शिंदे (९) या पाच चिमुकल्यांना डेंग्यूसदृश आजाराने ग्रासले आहे. त्यांच्यावर मेहकर व औरंगाबाद खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. परिसरात डेंग्यूसदृश तापाचे रुग्ण वाढतच असून, घराघरात अज्ञात तापाचे रुग्णही दिसून येत आहेत. तरीसुद्धा आरोग्य विभागाने या प्रकाराची दखल घेतलेली नाही. गावातील रुग्णांना शासनाच्या आरोग्य सुविधा मिळत नसून, त्यांना खासगी रुग्णालयात धाव घ्यावी लागत आहे. विशेष म्हणजे या गावातील पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासले जात नाहीत. त्याचबरोबर अद्यापपर्यंंत धूर फवारणीही करण्यात आली नाही. त्यामुळे डासांचा उद्रेक वाढला असून, परिणामी साथ रोगाचे प्रमाण वाढले आहे. येथे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने स्वच्छता अभियान राबवून धूरफवारणी करण्याची मागणी होत आहे.
पाच चिमुकल्यांना डेंग्यू
By admin | Updated: November 19, 2014 01:18 IST