सिंदखेड राजा तालुक्यातील जांभोरा, सोयंदेव, चांगेफळसह परिसरामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून अवैध दारूविक्री मोठ्या प्रमाणावर सुरू असून, त्यामुळे गावामध्ये वादाचे प्रमाण वाढले आहे. दारूमुळे महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचेही प्रमाण वाढले आहे. तरुण पिढी व्यसनाधीन होत आहे. त्यामुळे गावातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. वाढत असलेल्या अवैध दारूविक्रीमुळे राज्य उत्पादन शुल्क विभागावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. ही दारू विक्री तात्काळ बंद करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी महाराष्ट्र राज्य दारूबंदी जनआंदोलन समितीचे जिल्हाध्यक्ष समाधान देशमुख, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका सचिव अजय मोगल, तालुका सचिव ऋषिकेश देशमुख, वैभव गंडे, दारूबंदी जनआंदोलन समितीचे सज्जन शेळके, सचदेव खरात, कृष्णा जावळे, अभिजित खरात, ऋषिकेश गंडे आदी उपस्थित होते.
दारूविक्रीकडे दुर्लक्ष
दारू विक्रीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे दारू विक्रेत्यांना अभय मिळत आहे. परिणामी गावात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे.