---
बुलडाणा : कोरोना संचारबंदी, लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यासोबतच कलम १४४ रद्द करावे. सोबतच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी भास्कर मोरे यांनी केली आहे.
---------
नाल्यांची साफसफाई करावी
मोताळा : शहरातील नाल्यांची साफसफाई करून शहरात सर्वत्र निर्जंतुकीकरण द्रावणाची फवारणी करावी, अशी मागणी विनोद चिमापुरे यांनी बुधवारी नगर पंचायत प्रशासनाकडे केली आहे.
---
संचारबंदीमुळे व्यापाऱ्यांमध्ये नाराजी
सिंदखेड राजा : कोरोना संचारबंदीमुळे सिंदखेड येथील व्यापाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. गत वर्षभरात शासनाने कोणतीही मदत न देता, व्यापारी आणि कष्टकऱ्यांना त्रास देणे सुरू ठेवले आहे. त्यामुळे व्यापारी वर्गात लॉकडाऊनप्रति नाराजी उमटत आहे.
--
कचरा घंटागाडी अनियमित
बुलडाणा : शहरात कोरोनाचा वाढता उद्रेक असतानाही शहरातील प्रभाग २ मधील कचरा घंटागाडी काही दिवसांपासून अनियमित येत आहे. त्यामुळे चौक आणि रस्त्यावर कचरा साचलेला राहतो.
--------
शनिवारपासून इसम बेपत्ता
बुलडाणा : खामगाव तालुक्यातील इसम बुलडाणा येथे सांगून घरून निघाला. मात्र, शनिवारपासून घरी परतला नाही. इद्रीस शहा बुढन शहा (३८) असे बेपत्ता इसमाचे नाव आहे.
----
सोयाबीनचा दर तेजीत
चिखली : गत तीन दिवसांपासून सोयाबीनच्या दरात सातत्याने तेजी येत आहे. साडेतीन हजार ते साडेपाच हजार रुपयांपर्यंत दर स्थिरावरलेले असतानाच, गत दोन दिवसांत ते ६,३५० रुपयांवर गेले आहेत.
----
मुक्ताई मंदिरात विविध कार्यक्रम
बुलडाणा : बुलडाणा-खामगाव रोडवरील पाळा येथील मुक्ताई मंदिरात बुधवारी एकादशीनिमित्त पूजाअर्चा करण्यात आली. या वेळी ह.भ.प. शांताराम महाराज पाळेकर यांनी मार्गदर्शन केले.
-------
कांदा बीजोत्पादन काढणीला
बुलडाणा : जिल्ह्यातील कांदा बीजोत्पादन काढणीला आले आहे. जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांत कांदा बीजोत्पादन घेण्यात आले. या पिकाला अवकाळी पावसाचा फटका बसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामनाही करावा लागला होता.
-----
ऑटोमधून विनामास्क प्रवासी वाहतूक
बुलडाणा : कोरोना आपत्ती व्यवस्थापन नियमांचा भंग करीत शहरातील काही ऑटोचालक विनामास्क प्रवासी वाहतूक करीत आहेत. ‘नो मास्क - नो एन्ट्री’ मोहिमेचा जिल्ह्यातील प्रवासी आणि प्रवासी वाहतूक करणाऱ्यांना विसर पडल्याचे दिसून येते.
नळ जोडण्यांची घेणार माहिती
बुलडाणा : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नळ जोडण्यांची माहिती घेण्याची मोहीम जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत एप्रिल महिन्यात सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये गावातील घरे आणि वैध नळ जोडण्यांची माहिती घेतली जाणार आहे.
---
उन्हाळी भुईमूग पीक बहरले!
बुलडाणा : जिल्ह्यातील तीन हजार हेक्टर क्षेत्रात उन्हाळी भुईमूग पिकाची लागवड करण्यात आली. यामध्ये या वर्षी खामगाव तालुक्यात भुईमूग पिकाच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. जिल्ह्यातील चिखली, खामगाव, संग्रामपूर, जळगाव जामोद येथे उन्हाळी भुईमूग पीक घेतले जाते.
----
कोविड अहवालासाठी रुग्णांची फरपट
बुलडाणा : जिल्ह्यात कोविड रुग्णांची संख्या वाढल्याने चाचण्यांचेही प्रमाण वाढले आहे. मात्र, चाचणी केल्यानंतर अहवालासाठी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना प्रतीक्षा करावी लागते. सात-आठ दिवसांपर्यंत अहवाल मिळत नसल्याने बाधित रुग्ण कोरोना पसरवित असल्याचे दिसून येते.
----
रेमडेसिवीरचा काळाबाजार रोखा
बुलडाणा : कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी कोरोनासाठी लागणारी औषधे गरिबांना परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देणे ही शासनाची जबाबदारी आहे. मात्र, रेमडेसिवीर इंजेक्शनचा जिल्ह्यात तुटवडा जाणवत असून, या औषधांचा काळाबाजारही सुरू आहे. हा काळाबाजार रोखण्याची मागणी होत आहे
----------