जिल्ह्यातील क वर्ग असलेल्या देऊळगाव राजा नगरपालिकेतील काही कर्मचाऱ्यांनी शासनाने जेव्हा सहावा वेतन आयोग लागू केला, त्या आयोगाच्या शिफारशीमध्ये कोणत्याही कर्मचाऱ्यांना आगाऊ वेतनवाढ देता येणार नाही, असा निर्णय घेतलेला होता. या आदेशाची पायमल्ली करीत अनेक कर्मचाऱ्यांनी चुकीची माहिती नगरपालिका प्रशासनाला देऊन नियमबाह्य वेतनवाढ लागू करून घेतली. शासनाला लाखो रुपयांचा चुना लावला, याबाबत सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत खरात यांनी विभागीय आयुक्त अमरावती, जिल्हाधिकारी बुलडाणा यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. याबरोबरच विद्यमान संचालक तथा आयुक्त नगरपालिका प्रशासन संचालनालय मुंबई यांना स्पीड पोस्टाद्वारे ही तक्रार पाठविण्यात आली आहे. देऊळगाव राजा नगरपालिकेची आर्थिक परिस्थिती हलाखीची असून उत्पन्नाचे स्रोत ही मर्यादित आहे, असे असताना पालिकेतील काही कर्मचाऱ्यांनी सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार चुकीची माहिती सादर करून शासनाच्या आदेशाची पायमल्ली केली. प्रशासनाची दिशाभूल करून नियमबाह्य वेतनवाढ लागू करून घेऊन शासनाची लुबाडणूक केली आहे. पालिकेतील ज्या कर्मचाऱ्यांनी नियमबाह्य वेतन वाढ करून घेऊन शासनाची फसवणूक केली आहे. त्यांच्याकडून एकरकमी रक्कम वसूल करून त्यांच्याविरुद्ध प्रशासकीय कारवाई प्रस्तावित करावी, त्यांना साहाय्य करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
नियमबाह्य वेतनवाढ घेणाऱ्या कर्मचाऱ्यावर कारवाईची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:32 IST