बुलडाणा : जिल्ह्यातील निवडणूक जाहीर झालेल्या ५२१ ग्रामपंचायतींपैकी २८ ग्रामपंचायती अविरोध झाल्यामुळे उर्वरित ४९३ ग्रामपंचायतींसाठी मंगळवारी मतदान घेण्यात आले. मतमोजणी गुरुवारी सकाळी ८ वाजता होणार आहे. यावेळी निवडणूक रिंगणात असलेल्या सुमारे ३ हजार ९५८ उमेदवारांचे भाग्य उजळणार आहे. निवडणुकीच्या मतमोजणीसाठी प्रशासनाने तयारी पूर्ण केली असून, सकाळी ८ वाजता मतमोजणीला प्रारंभ होणार आहे. मतमोजणी शांततामय वातावरणात पार पडावी, यासाठी पोलिसांचा पुरेसा फौजफाटादेखील उपलब्ध करून देण्यात आला आहे. मतमोजणी बुलडाणा, मोताळा, जळगाव जामोद, संग्रामपूर, देऊळगाव राजा, मेहकर, लोणार व नांदुरा येथील तहसील कार्यालयात होणार आहे, तर खामगाव येथे नगरपालिका कन्या शाळा, रेल्वे गेटजवळ, शेगाव येथे पणन महासंघाचे गोडाऊन, मलकापूर येथील बाजार समिती बेलाड, चिखली येथील तालुका क्रीडा संकुल, तर सिंदखेडराजा तालुक्याची मतमोजणी नगरपालिका टाउन हॉल येथे होणार आहे. बुलडाणा तालुक्यातील ४८ ग्रामपंचायतीसाठी मतमोजणी बुलडाणा तहसील कार्यालयात तहसीलदार दीपक बाजड यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी ११ वाजता सुरू होणार आहे. यासाठी १२ टेबल सज्ज करण्यात आले असून, पोलिसांचा चोख बंदोबस्त राहणार आहे. निकालाची सर्व नागरिकांमध्ये प्रतीक्षा असून, उमेदवारांमध्येही निकालाची उत्सुकता वाढली आहे. ८४६ उमेदवार अविरोध जिल्ह्यातील एकूण १३ तालुक्यांतून सुमारे ८४६ उमेदवार हे बिनविरोध निवडून आले आहेत. यात बुलडाणा तालुक्यातून ८५, चिखली ३५, दे. राजा २0, सिंदखेडराजा ४२, मेहकर ६८, लोणार १0४, मलकापूर ४0, मोताळा ७0, नांदुरा ७८, खामगाव ७९, शेगाव ५५, जळगाव जामोद ६२, तर संग्रामपूर तालुक्यात ४८ एकूण ८६४ उमेदवरांचा समावेश आहे.
उमेदवारांच्या भाग्याचा निर्णय आज
By admin | Updated: August 6, 2015 00:28 IST