खामगाव (बुलडाणा): फारकत द्यावी, यासाठी डॉक्टर पतीने घरात कोंडून ठेवले; तसेच फारकत न घेतल्यास आपल्यासह आपल्या दोन मुलींना जीवे मारण्याची धमकी दिली, अशी फिर्याद डॉक्टर असलेल्या पत्नीने काल गुरुवार २३ ऑक्टोबर रोजी शहर पोलिस स्टेशनला दिली. या फिर्यादीवरुन पोलिसांनी डॉक्टर पतीसह एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.याबाबत डॉ.जयमाला भगतसिंग राजपूत (वय ३८) रा.सिव्हिल लाईन खामगाव यांनी काल शहर पोलिस स्टेशनला तक्रार दिली की, काल २३ ऑक्टोबर रोजी दिवाळीचे दिवशी घरी असताना पती डॉ.भगतसिंग राजपूत यांच्यासह एक महिला दुपारी १२ वाजता घरी आली व त्यांनी संगनमत करुन आम्ही लग्न केलेले आहे, त्यामुळे तू फारकत (घटस्फोट) दे, या कारणावरुन मारहाण केली. तसेच फारकत न दिल्यास तुला व मुलींना जीवे मारु, अशी धमकी देत घरात कोंडून ठेवले, अशा आशयाची फिर्याद डॉ.जयमाला भगतसिंग राजपूत यांनी काल २३ ऑक्टोबर रोजी शहर पोलिस स्टेशनला दिली. या फिर्यादीवरुन शहर पोलिसांनी डॉ.भगतसिंग भानुलालसिंग राजपूत रा.सिव्हिल लाईन खामगाव तसेच खामगाव येथीलच आणखी एक महिला अशा दोघांविरुद्ध कलम ३४२, ५0४, ५0६, ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे.
दिवाळीच्या दिवशी पत्नीला कोंडले घरात!
By admin | Updated: October 24, 2014 23:20 IST