१८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ ते ७ वाजेच्या सुमारास मलकापूर पांग्रा, शेंदुर्जन, साखरखेर्डा परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाला. विजांचा गडगडाट आणि वादळाने शेतकऱ्यांना सळो की पळो करून सोडले. हातातील कामे टाकून शेतकरी सोंगून ठेवलेला हरभरा ओला होऊ नये म्हणून झाकून टाकण्यासाठी शेतावर गेला. कसाबसा हरभरा जमा करून गंजी मारली; परंतु फारसा उपयोग झाला नाही. वादळामुळे झाकण टाकलेल्या ताडपत्र्या उडाल्या. साखरखेर्डा परिसरात वादळामुळे गव्हाचे नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील गहू सोंगणीला आला होता; परंतु वादळाने तो खाली पडल्याने काढणीला खर्च आणि वेळ लागणार आहे. मोहाडी, राताळी, तांदूळवाडी, दरेगाव, शेंदुर्जन शिंदी, पिंपळगाव सोनारा, सावंगी भगत, गोरेगाव, उमनगाव, पांग्रीकाटे, सायाळा, लिंगा, बाळसमुंद्र, राजेगाव जागदरी, जनुना तांडा, देऊळगाव कोळ, झोटिंगा या भागात बीजवाईचा कांदा मोठ्या प्रमाणात लावला जातो. झोटिंगा, मलकापूर पांग्रा, देऊळगाव कोळ, हनवतखेड, आंबेवाडी या भागात गारपीट झाल्याने बीजवाईत आलेल्या फुलाला फटका बसला आहे. जवळजवळ ५० ते ६० हेक्टर क्षेत्रावर या बीजवाईची लागवड केली जाते. बाजारात ६० हजार रुपये क्विंटलचा भाव मिळत असल्याने दरवर्षी याची लागवड होते. गारपिटीचा फटका बसल्याने संपूर्ण बीज निकामी होते. गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकाचा सर्व्हे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी माजी कृषी सभापती दिनकरराव देशमुख, जिल्हा परिषद सदस्य राम जाधव यांनी तहसीलदार सुनील सावंत यांच्याकडे केली आहे.
मलकापूर पांग्रा परिसरात पिकांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:39 IST