दुसरबीड परिसरात गहू, हरभरा साेंगणीला आले आहेत. पाेषक वातावरण आणि पाणी उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांनी माेठ्या प्रमाणात गहू, हरभरा व इतर रब्बी पिकांची पेरणी केली आहे. सध्या गहू, हरभरा काढणीसाठी आलेला आहे. अशातच १८ फेब्रुवारी राेजी सायंकाळी वादळासह गारपीट झाली. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील गहू, हरभरा जमीनदाेस्त झाला. आधीच परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यातून सावरत शेतकऱ्यांनी रब्बी पिकांची पेरणी केली. सध्या गहू, हरभरा काढणीला आलेला असतानाच, अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. वादळासह गारपीट झाल्याने गहु, हरभरा, टाेमॅटाे व इतर पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आधीच शेतकरी संकटात सापडलेलेे असताना, आणखी एक संकट शेतकऱ्यांवर आले आहे. नुकसानग्रस्त भागात सर्वेक्षण करून मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
गारपिटीमुळे पिकांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:39 IST