बुलडाणा : जिल्ह्यात तिसऱ्या लाटेचे संकट गडद होत असून, सक्रिय रुग्णांची संख्या शतकाच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. त्यातच जिल्ह्यातील एक ते दोन तालुक्यांतून येणाऱ्या संदिग्ध रुग्णांच्या सिटीस्कॅनचा स्कोअरही अधिक येत आहे. त्यामुळे अशा संदिग्ध रुग्णांनाही कोविड समर्पित रुग्णालयात उपचारासाठी दाखल करून घेण्यात येत आहे. परिणामी हे तिसऱ्या लाटेचे तर संकेत नाहीत ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दुसरीकडे शनिवारी तपासणी करण्यात आलेल्या संदिग्धांच्या अहवालांपैकी १७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, तर १३५३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये देऊळगाव राजा शहरातील २, सातेफळ एक, भोकर एक, गोद्री दोन, चिखली एक, घाटनांद्रा एक, वरवंड एक, खामगाव तीन, शेगाव ३, कोयाळी दहातोंडे येथील दोघांचा समोश आहे. तपासणी करण्यात आलेल्या संदिग्धांपैकी ६ लाख ९६ हजार ८९२ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आतापर्यंत ८६ हजार ७१० बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. अद्यापही १ हजार १५० संदिग्धांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. सध्या जिल्ह्यात एकूण ८७ हजार ४७३ कोराेना बाधित असून, सक्रिय रुग्णांची संख्या आता ९० झाली आहे.
--नवीन स्ट्रेनची भीती?--
बुलडाणा जिल्ह्यात चिखली, मेहकर तालुक्यांसह काही ठरावीक भागातून संदिग्ध रुग्ण येत आहेत. त्यांचे कोरोना चाचणीचे अहवाल निगेटिव्ह येत असले तरी त्यांचा सिटी स्कॅनचा स्कोअर हा अधिक येत आहे. त्यामुळे एखादा नवीन स्ट्रेन तर आला नाही ना? अशी भीती व्यक्त होत आहे. अलीकडील काळात असे दररोज दोन ते तीन रुग्ण भरती होत आहेत, की ज्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली; तरीपण सिटी स्कॅनचा स्कोअर अधिक असण्यासोबतच कोरोनासदृश न्यूमोनिया असल्याचे स्पष्ट होत असल्याचे कोविड समर्पित रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले.
--१०० नमुने जिनोमिक अभ्यासासाठी--
बुलडाणा जिल्ह्यातून दर महिन्याला सरासरी १०० नमुने हे पुणे येथील विषाणू तपासणी प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात येत आहे. परंतु त्यात डेल्टा, डेल्टा प्लस तथा अन्य स्वरूपाचा म्युटेशन झालेला कोरोना व्हायरस असल्याबाबतचा अहवाल आरोग्य विभागाला अद्याप मिळालेला नाही, अशी माहिती कोविड समर्पित रुग्णालयाचे डॉ. सचिन वसेकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले. मात्र, चाचणी निगेटिव्ह आल्यानंतरही सिटी स्कॅनमध्ये स्कोअर अधिक येत असल्याचे ते म्हणाले.
--महिनाभरात २०६ बाधित, एकाचा मृत्यू--
गेल्या एक महिन्यात जिल्ह्यातील ५५ हजार २५४ संदिग्धांची तपासणी करण्यात आली असून, त्यामध्ये २०६ जण कोराेना बाधित आढळून आले आहेत. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला होता. महिनाभरापूर्वी दैनंदिन पॉझिटिव्हिटी रेट ०.१८ टक्के होता, तर तो आज १.२४ टक्के झाला आहे. प्रोग्रेसिव्ह पॉझिटिव्हिटी रेट अद्यापही ११.०५ टक्क्यांवरच आहे.