जिल्ह्यात पहिला कोरोनाबाधित रुग्ण सापडण्याला डिसेंबरमध्ये आठ महिने पूर्ण झाले आहेत. सुरुवातीच्या काळात रुग्णवाढीचा वेग मोठ्या प्रमाणावर होता. सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात कोराेनाची लाट आली होती. ऑक्टोबरमध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोना संक्रमणाचा वेग वाढला होता. त्यानंतर दुसऱ्या लाटेची भीती व्यक्त होत होती. कोरोना चाचण्या वाढविण्यात आल्या असल्या तरी आता हळूहळू कोरोनाबाधित रुग्ण सापडण्याचे प्रमाण कमी झाले आहे. परंतु आरोग्य यंत्रणा सतर्क असल्याने व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. त्यामुळे कोरोनापासून अनेकांचा बचाव झालेला आहे. कोरोना संसर्गाची व्याप्ती आता कमी झाली आहे.
तालुकानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या घटली
जिल्ह्यात तालुकानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या घटली आहे. जिल्ह्यात सध्या ३२० कोरोनाबाधित रुग्ण ॲक्टिव्ह असून, त्यांच्यावर कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. डिसेंबरअखेर २२७ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू होते. नोव्हेंबरअखेरमध्ये जिल्ह्यात ३२९ कोरोनाबाधित रुग्ण ॲक्टिव्ह होते. यातील बहुतांश तालुक्यातील रुग्णांची संख्या आता कमी झाली आहे.
दैनंदिन बाधित रुग्ण सापडण्याचे प्रमाण कमी
दररोज करण्यात येणाऱ्या तपासण्यांमध्ये बाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाण कमी झाले आहे. बुधवारी ६२जण कोरोनाबाधित आढळून आले. त्याचे प्रमाण पाहता दैनंदिन स्तरावर जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाण खाली आल्याचे दिसून येते.