चिखली : कोरोनामुळे उद्भवलेल्या सध्याच्या संकटकाळात प्रत्येकाने माणुसकी जपायला हवी, असा संदेश दिल्या जात आहे. याच माणुसकीच्या नात्याने सर्वांना मदत करण्याची इच्छा बाळगून असलेल्या येथील सुहृदयी तरुण गजू तारू यांनी योग्य आपल्या ''''जेएमडी परिवार'''' या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून जेवणाची व्यवस्था नसलेल्या काेरोना बाधित रुग्ण व त्यांच्या संपूर्ण कुटुंबास घरपोच मोफत जेवण देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. याअंतर्गत शहर व परिसरात दररोज सुमारे शंभरावर जेवणाचे डबे पुरविण्यात येत आहेत.
करोनाच्या वाढत्या संसर्गामुळे अनेक लोकांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. यापूर्वी एखादी व्यक्ती आजारी पडल्यास त्या व्यक्तीला जेवणाचा डबा देण्यासाठी असंख्य नातेवाईक, मित्रपरिवार धावून जात असत. प्रामुख्याने दवाखान्यात भरती असलेल्या रुग्णाच्या नातेवाईकाना डबा घेऊन येऊ का किंवा डबा घेऊन येतो, असे विचारणे व त्यांना डबा पोहविणे, प्रत्यक्ष भेटून आस्थेवाईकपणे चौकशी करणे. या बाबी सर्वसाधारणपणे घडत असत. मात्र, कोरोनाने या सर्व बाबीला आडकाठी आणली असल्याने माणुसकी विसरू नका, असा संदेश प्रामुख्याने सोशल मीडियावर फिरत आहे. मात्र, अशा वातावरणात गजानन तारू यांनी कोरोनापीडितांना घरगुती जेवणाचा डबा मोफत देण्याचा उपक्रम गेल्या आठवडाभरापासून सुरू केला आहे. ज्या घरात कोरोनाचे रुग्ण आहेत किंवा जे स्वत: बाधित आहेत आणि ज्यांची जेवणाची व्यवस्था होऊ शकत नाही, अशा नागरिकांना घरपोच जेवणाचे डबे पोचविण्याचे काम तारू आपल्या ''''जय माता दी'''' परिवाराच्या माध्यमातून करीत आहेत. संकटकाळात कायम धावून जाणाऱ्या गजू तारू यांनी यांनी कठीण काळातदेखील मदतीचा योग्य मार्ग निवडून स्वखर्चातून ही सेवा पुरवित असल्याने त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
गरजूंनी नि:संकोचपणे संपर्क साधावा !
गजू तारू आपल्या कुटुंबीयांच्या मदतीने घरीच सात्त्विक भोजन तयार करून करून घेत आहेत. एखाद्या व्यक्तीने फोन केल्यानंतर त्या व्यक्तीच्या घरी शे. यासीन व राहुल सुरडकर यांच्याव्दारे घरपोच डबा दिला जात आहे. याअंतर्गत दररोज सकाळ-संध्याकाळ सुमारे १०० डबे घरपोच पोहचविण्यात येत आहेत. दरम्यान, गरजूंनी नि:संकोचपणे संपर्क साधावा, असे आवाहन गजू तारू यांनी केले आहे.