काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आ. राहुल बोंद्रे यांनी चिखली शहरातील प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलांचा दुसरा हफ्ता देण्याची मागणी नगरविकास मंत्री ना. एकनाथराव शिंदे व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे. यामध्ये केंद्र शासनाचा हिस्सा अद्याप प्राप्त न झाल्याने अनुदानाच्या प्रतीक्षेतील लाभार्थी अडचणीत सापडले असल्याचे आ.बोंद्रेंनी म्हटले आहे. यावरून भाजपा शहराध्यक्ष पंडितराव देशमुख यांनी बोंद्रेंवर टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत चिखली शहरासाठी २०१७ मध्ये ५६५, २०१८ मध्ये १९३, २०१९ मध्ये १४३ असे एकूण ७७२ घरकुले मंजूर झालेली आहेत. यामधील राज्य शासनाचा हिस्सा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतानाच २०१७, २०१८ आणि २०१९ मध्ये मंजूर घरकुलांच्या अनुदानाचे ६.९९४ कोटी मिळालेले आहेत व त्यांचे लाभार्थ्यांना वाटपही करण्यात आले. केंद्र शासनाकडून २०१७ मधील अनुदानाचा ३.३९ कोटी रुपयांचा हप्तासुद्धा मिळालेला असून, त्याचेही वाटप झालेले आहे; मात्र म्हाडाने अद्यापही केंद्राला उपयोगिता प्रमाणपत्र दिलेले नसल्याने केंद्राकडून अनुदान प्राप्त झालेले नाही. २०२२ पर्यंत सर्वांना घरकुल हे नरेंद्र मोदींचे स्वप्न आहे, असेही देशमुख यांनी या प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्ट केले.
ही तर नौटंकी!
काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी चिखली शहरातील शासकीय निवासस्थानासाठी आरक्षित जागेवर घरकुल बांधण्यासाठी परवानगी देण्यासाठी प्रस्ताव पाठविण्याची जी मागणी केली आहे, ती आ.श्वेता महाले यांनी या अगोदरच २१ नोव्हेंबर रोजीच जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. १५ वर्षे सत्तेत राहूनही जे करता आले नाही ते आता पराभूत झाल्यानंतर करण्याचे नाटक करत राहायचे, याला नौटंकी नाही तर काय म्हणावे, असा आरोप पंडितराव देशमुख यांनी केला.