बुलडाणा : शहरातील अनेक भागातील विद्युत तारा लोंबकळत असून, रोहित्र अनेक ठिकाणी उघडे आहेत. त्यामुळे नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. याकडे वीज वितरण कंपनीचे दुर्लक्ष होत असल्यामुळे केव्हाही मोठा अपघात होण्याची शक्यता आहे.वीज वितरण मंडळाचे खासगीकरण झाल्यापासून सर्वत्र कारभार ढेपाळला आहे. शहरातील अनेक भागातील विद्युत रोहित्रांवर झाकण नाही. तर काही ठिकाणी रोहित्र पुर्णपणे तुटले आहेत. शहरातील बर्याच वीज खांबांवर विद्युत रोहित्र हे जमिनीपासून ३ ते ४ फूट उंचीवर असल्याने त्याची वायरिंग जमिनीवर लोंबकळत आहे. रोहित्राला सहजरीत्या कोणाचाही धक्का लागून दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही महिन्यांपूर्वी वीज वितरण कंपनीने शहरातील काही भागात नवीन रोहित्र लावले आणि खांबावर नवीन वीजतारा ओढल्या; मात्र यातील बरीच कामे ही अत्यंत निकृष्ट दर्जाची झाली आहेत. शहरातील संगम चौक, सराफा गल्ली, इकबाल चौक, तेलगुनगर, पोलीस लाईन, जुनागाव परिसरातील रोहित्र जळणे, वीजपुरवठा खंडित होणे अशा समस्या नेहमीच्याच झाल्या आहेत. शहरातील नगर परिषदचामागील भाग, क्रीडा संकुल मार्ग, चर्च रोड, औरंगाबाद रोड, मलकापूर रोड, धाड नाका येथे बर्याच ठिकाणी उघडे विद्युत रोहित्र दुर्घटनेला आमंत्रण देत आहे, तर शहरातील दाट लोकवस्तीच्या ठिकाणी लहान मुले खेळत-खेळत विद्युत रोहित्राजवळ जाऊन उघड्या रोहित्राला छेडछाड करण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
लोंबकळणा-या तारा धोकादायक
By admin | Updated: November 29, 2014 00:13 IST