मेहकर शहरात गेल्या अनेक महिन्यापासून मोठ्या प्रमाणावर डुकरांचा सुळसुळाट निर्माण झाला. डुकराने अनेक मुलांना यापूर्वी चावा घेतलेला आहे. डुकरांच्या विविध वार्डात बसलेले कळप नागरिकांसाठी भितीचे वातावरण बनले आहेत. येथील वार्ड क्रमांक १२ मधील नऊ वर्षीय आयशा सय्यद असिफ घरासमोर खेळत असताना डुकराचा कळप तिच्या अंगावर धावून आला. त्यातील एका डुकराने तिला चावा घेतल्याने ती गंभीर जखमी झाली. त्यामुळे संतप्त झालेल्या परिसरातील नागरिकांनी त्या मुलीला घेऊन नगरपरिषदेत सुरू असलेल्या विषय समिती निवडणूक बैठकीत धडक दिली. त्या ठिकाणी उपविभागीय अधिकारी गणेश राठोड, मुख्याधिकारी सचिन गाडे, नगराध्यक्ष हाजी कासम गोवळी, उपाध्यक्ष जयचंद भाटिया, सभापती तोफिक कुरेशी आदी उपस्थित होते. डुकरांच्या मालकावर पोलीस कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. संतप्त नागरिकांचा रोष पाहून संबंधित अधिकाऱ्यांनी तत्काळ पोलिसांना पाचारण केले.
मेहकर शहरात राबविणार डुकरे पकडण्याची माेहीम
मेहकर नगरपालिका मुख्याधिकारी संजय गाडे, नगराध्यक्ष कासम गवळी यांनी संतप्त नागरिकांना शांत करून शुक्रवारपासून शहरात डुकरे पकडण्याची मोहीम राबविणार असल्याचे सांगितले. तसेच संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याने जमाव शांत झाला.