लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : गत सहा दिवसांपासून शेतकऱ्यांनी संप पुकारून मागण्या लावून धरल्या आहेत; मात्र शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होत नसल्याने चिखली शहरातील एका टॉवरवर मुख्यमंत्र्यांचा पुतळा लटकवून प्रहारचे, स्वाभिमानी, शेतकरी संघटना व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी शोले स्टाइल आंदोलन केले.भाजप सत्तेवर येऊन तीन वर्ष उलटली; परंतु निवडणुकीत शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न केल्याने शेतकरी आज सरकारच्या विरोधात उभा ठाकला आहे तर शेतकरी आपल्या हिताच्या प्रमुख मागण्या घेऊन संप करीत असून, महाराष्ट्रभर आंदोलने करीत आहे; परंतु मुख्यमंत्री उपाययोजना करण्याचे सोडून या आंदोलनात फूट पाडण्याचे काम करीत असल्याचा आरोप करीत स्वाभिमानी, प्रहार संघटना, शेतकरी संघटना व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी चिखली शहरातील टॉवरवर चढून मुख्यमंत्र्यांचा पुतळा उलटा लटकवून प्रचंड घोषणाबाजी केली. दरम्यान, आंदोलनस्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते. या आंदोलनांतर्गत संजय इंगळे, देवीदास कणखर, नितीन राजपूत, विनायक सरनाईक, दत्ता सुसर, संतोष शेळके, भरत जोगदंडे, अनिल चौहाण आदी कार्यकर्त्यांनी टॉवरवर चढून शोले स्टाइल आंदोलन केले. तर कपिल खेडेकर, विनोद खरपास, प्रमोद पाटील, डॉ.सत्येद्र भुसारी, बंटी लोखंडे, रवी पेटकर, सुनिल वाघ, शेषराव शेळके, राम अंभोरे, विलास तायडे यांच्यासह कार्यकर्ते व शेतकरी सहभागी होत टॉवरजवळ ठिय्या दिला होता. आंदोलन पाहण्याकरिता नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
मुख्यमंत्र्यांचा पुतळा टॉवरवर लटकवून निषेध!
By admin | Updated: June 8, 2017 02:32 IST