नांदुरावासीयांनी अनुभवली बर्निंग ट्रेन
नांदुरा : येथील रेल्वे स्थानकामध्ये सकाळी आठच्या सुमारास उभ्या असलेल्या मालगाडीच्या बोगीमधून धूर निघत असल्याची बाब शालीमार एक्स्प्रेसच्या चालकाच्या लक्षात येताच त्याने याबाबत रेल्वे अधिकाऱ्यांना माहिती दिली. अग्निशमन यंत्रणेच्या मदतीने मालगाडीतील कोळसा विझवून रेल्वे कर्मचाऱ्यांनी मोठा अनर्थ टाळला.१३ एप्रिलच्या सकाळी ८ वाजेदरम्यान सुमारे ६० बोग्यांची मालगाडी नाशिककडे जात असताना थांबली होती. त्याचवेळी नागपूरकडे जाणाऱ्या शालीमार एक्स्प्रेसमधील चालकाला इंजीनपासून विसाव्या मालगाडीच्या बोगीतून धूर निघत असल्याचे निदर्शनास आले. त्याने याबाबत तत्काळ रेल्वे अधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर त्या मालगाडीची आगग्रस्त बोगी वेगळी करण्यात आली. त्यानंतर नांदुरा नगर परिषदेच्या अग्निशमन यंत्रणेला पाचारण करून आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. शालीमारच्या चालकाची जागृतीशालीमार एक्स्प्रेसच्या चालकाला धुराचे लोट मालगाडीच्या बोगीतून येत असल्याचे दिसले. त्याने तत्काळ रेल्वे अधिकाऱ्यांना याबाबत सांगितल्यामुळे मोठी दुर्घटना टळली.