खामगाव (बुलडाणा): स्थानिक मस्तान चौक भागातून तीन दिवसांपूर्वी चोरीला गेलेला मेटॅडोर आज रेतीची वाहतूक करीत असताना बाळापूर पोलिसांनी पकडले. स्थानिक जुनाफैल भागातील आयशा खानम इकराब खान यांचा मेटॅडोर क्र.एमएच 0६-३३९६ हे ८ नोव्हेंबर रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी मस्तान चौक भागातील उर्दू शाळा क्र.२ च्या प्रांगणातून चोरून नेला होता. याबाबत शिवाजी नगर पो.स्टे.ला दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी काल गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, चोरीला गेलेल्या या मेटॅडोरने अवैधरित्या रेतीची वाहतूक होत असताना बाळापूर पोलिसांना आढळून आले. त्यामुळे बाळापूर पोलिसांनी चोरीचा मेटॅडोर ताब्यात घेऊन याबाबत शिवाजीनगर पो.स्टे.ला माहिती दिली. त्यामुळे शिवाजीनगर पो.स्टे.चे पोलिस उपनिरीक्षक गजानन जोशी यांच्यासह पोहेकाँ जायभाये, सोळंके आदींनी बाळापूर गाठून सदरचे मेटॅडोर ताब्यात घेऊन शिवाजी नगर पो.स्टे.ला आणला आहे. सदर चोरीचा मेटॅडोर बाळापूर येथे दोन लाख रुपयात विकण्यात आल्याची माहिती पोलिस सुत्रांनी दिली आहे.
चोरीला गेलेला मेटॅडोर पकडला
By admin | Updated: November 12, 2014 00:10 IST