बुलडाणा : जिल्ह्यात ५२७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका हाेत असून, २९ ग्रामपंचायती अविराेध झाल्याने, ४९८ ग्रामपंचातींसाठी प्रत्यक्ष मतदान हाेणार आहे. १५ जानेवारी राेजी मतदान हाेणार १३ जानेवारी राेजी प्रचार ताेफा थंडावल्या आहेत. मतदानाच्या एक दिवस आधी उमेदवार गुप्त बैठका घेऊन मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करणार आहेत. प्रशासनाकडून निवडणुकीची जय्यत तयारी झाली असून, १४ जानेवारी राेजी निवडणुकीच्या साहित्याचे वितरण करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ५२७ ग्रामपंचायतींची मुदत संपल्याने निवडणूक हाेत आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी ३ हजार १६८ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यानंतर १० हजार १७५ उमेदवार रिंगणात राहीले हाेते. त्यापैकी ८८५ सदस्य अविराेध झाले आहेत. प्रत्यक्ष रिंगणात ९ हजार २९० उमेदवार रिंगणात आहेत. १ हजार ७७१ प्रभागांतून ४ हजार ८०५ जागांसाठी निवडणुक हाेत आहे. जिल्ह्यात १,७९५ मतदान केंद्र राहणार आहेत, तसेच ११० झाेन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
ग्रामपंचायतींसाठी प्रचाराची मुदत १३ जानेवारी राेजी संपली आहे. त्यामुळे आता शेवटच्या दिवशी मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न उमेदवारांकडून हाेणार आहे. उमेदवारी अर्जच न आल्याने २९ जागा रिक्त राहणार आहेत. यामध्ये चिखली तालुक्यातील ५, मेहकर तालुक्यातील एक, खामगाव तालुक्यातील ३, जळगाव जामाेद तालुक्यातील ९, संग्रामपूर आणि मलकापूर तालुक्यातील प्रत्येकी एक, नांदुरा तालुक्यातील ३ आणि माेताळा तालुक्यातील सहा जागा रिक्त राहणार आहेत.
१ हजार ७९५ मतदान केंद्र
जिल्ह्यात १ हजार ७९५ मतदान केंद्र राहणार आहेत. यामध्ये बुलडाणा तालुक्यात २२१, चिखली तालुक्यात १९७, देऊळगाव राजा तालुक्यात ७७, सिंदखेड राजा तालुक्यातील १३७, मेहकर तालुक्यात ५१, लाेणार तालुक्यात १४२, खामगाव तालुक्यात २४२, शेगाव ११५, जळगाव जामाेद ९८, संग्रामपूर १०१, मलकापूर १०३, नांदुरा १६५, माेताळा तालुक्यात १४६ मतदान केंद्र राहणार आहेत.
एका बुथवर राहणार पाच कर्मचारी
जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी एका बुथवर पाच कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. यामध्ये एक केंद्राध्यक्ष व इतर तीन कर्मचाऱ्यांसह एक पाेलीस राहणार आहे. जिल्ह्यात तीन हजारांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांची निवडणुकीसाठी नियुक्ती करण्यात आली आहे.