ब्रह्मनंद जाधव बुलडाणा, दि.२३- तूरीसह गहू, हरभरा बाजार समितीमध्ये येत असून, बजार समित्यांमध्ये सध्या माल खरेदीचा हंगाम सुरू आहे; मात्र तुरीच्या नाफेड खरेदी बंदसह विविध सुविधांअभावी बुलडाणा बाजार समितीमध्ये ऐन हंगामाच्या काळातच शुकशुकाट पाहायला मिळत आहे. येथे ठोक खरेदीदार नसल्याने अडतेच या ठिकाणी खरेदीदार बनले आहेत. त्यामुळे बुलडाणा तालुक्यातील माल खामगावच्या बाजार समितीमध्ये विक्रीसाठी जातो.कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमाल उत्पादक म्हणजे शेतकरी हा महत्त्वाचा घटक आहे; मात्र बाजार समितीमध्ये शेतकरी आल्यानंतर त्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागत असल्याचे येथील बाजार समितीमध्ये दिसून येते. बुलडाणा बाजार समितीमध्ये खरेदीदारांचा अभाव आहे. जिल्ह्यात खामगाव, चिखली व मेहकर याठिकाणी मोठे खरेदीदार आहेत; मात्र बुलडाण्यात तशा प्रकारचे खरेदीदार नसल्याने अडतेच खरेदीदार बनले आहेत. सध्या तुरीपाठोपाठ गहू, हरभर, मका आदी माल शेतकरी विक्रीसाठी बाजार समित्यांमध्ये आणत आहेत. त्यामुळे प्रत्येक ठिकाणच्या बाजार समित्यांमध्ये शेतमालाची आवक वाढलेली दिसून येते; मात्र बुलडाण्याच्या बाजार समितीमध्ये याउलट परिस्थिती आहे. शेतकरी बैलगाडीने शेतमाल घेऊन आल्यास सदर शेतकर्याची कुठलीच व्यवस्था दिसून येत नाही. काही दिवसांपूर्वी नाफेडमध्ये तूर विक्रीसाठी घेऊन आलेल्या शेतकर्यांना मोठय़ा अडचणींचा सामना करावा लागला. बैलगाडी घेऊन आलेल्या शेतकर्यांना बैलगाडी रांगेत लावावी लागली; मात्र बैलांसाठी चारा व पाण्याची या बाजार समितीमध्ये कुठलीच व्यवस्था करण्यात आलेली नाही. ११ एकराचा परिसर असलेल्या या बाजार समितीमध्ये बैलगाडीद्वारे माल घेऊन आलेल्या शेतकर्यांच्या बैलांना चारा उपलब्ध करून देण्यात येत नसल्याची खंत शेतकर्यांनी व्यक्त केली; तसेच खरेदीदाराअभावी योग्य भाव शेतमालाला मिळत नाही. बुलडाण्यातील शेतमाल खामगावच्या बाजार समितीमध्ये विक्रीसाठी जात असल्याचे वास्तव समोर आले आहे. अशा विविध अडचणींमुळे बुलडाणा येथील बाजार समितीच्या गेटसमोरून दिवसाकाठी ३0 ते ४0 वाहने धाड, खामगाव, चिखली येथील बाजार समित्यांमध्ये जात आहे. त्याचबरोबर बजार समितीमधील प्रशासकीय कारभारही ढेपाळल्याचे दिसून येते.
अडतेच बनले खरेदीदार!
By admin | Updated: March 24, 2017 01:34 IST