राज्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणावर पसरत असलेल्या कोरोना विषाणूमुळे शहरातील बसस्थानकावर प्रवासी येत नाहीत. त्यामुळे अनेक बसफेऱ्या रद्द कराव्या लागत आहेत. मेहकर आगार हे मोठ्या प्रमाणावर उत्पन्न देणाऱ्या आगारातून एक समजले जाते. या आगारातून दररोज १२५ बसफेऱ्या सुरू असतात. लांब पल्ल्याच्या गाड्यांबरोबर ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणावर बसफेऱ्या सुरू असतात. मात्र सर्वत्र कोरोनाच्या प्रादुर्भाव वाढल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांकडून कोरोनाची भीतीने काहीच प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येते. प्रवाशांअभावी मेहकर तालुक्यातील अनेक बसफेऱ्या रद्द कराव्या लागत आहेत. आगारात एकूण शंभराच्या वर एसटी बसगाड्या असून, अंदाजे सात ते आठ लाख रुपये प्रतिदिवस उत्पन्न या आगाराला मिळत होते. मात्र कोरोनाच्या भीतीमुळे प्रवाशांची कमतरता होत असल्याने एक लाखाच्या आत उत्पन्न होत असून, मोठ्या प्रमाणावर उत्पन्नावर परिणाम झाला आहे.
महिन्याला ६० लाख रुपये खर्च
मेहकर आगारात एकूण ४८४ कर्मचारी वर्गावर अंदाजे दर महिन्याला ६० लाख रुपये खर्च करावा लागत आहे. या मेहकर आगारातील दर पंधरा दिवसांनी प्रत्येकी २० वाहक आणि चालक मुंबईला सेवा देण्यासाठी पाठविण्यात आले असून, येणाऱ्या सर्व चालक-वाहकांची तपासणीही करण्यात येत आहे. त्यातील अनेकजण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.