स्वच्छतेवर शासनाकडून कोट्यावधी रुपयांचा खर्च करण्यात येत आहे. प्रत्येक शहरामध्ये घंटागाड्या सुरू करण्यात आलेल्या आहेत. परंतु घंटागाड्यांवर सुरुवातीला बसविण्यात आलेली जीपीएस यंत्रणा आता बंद पडली आहे. काही घंटागाड्याच बंद असल्याने ट्रॅक्टर, मालवाहतूक करणारे छोटे वाहन याद्वारे कचरा संकलन करण्यात येत आहे. परंतु कचरा गोळा करणाऱ्या घंटागाड्यांवर नगरपालिकेचा वाॅच दिसून येत नाही.
वॉच ठेवण्यासाठी यंत्रणा तोकडी
घंटागाड्यावर वाॅच ठेवण्यासाठी जीपीएस यंत्रणा असूनही नसल्यासारखी आहे. जीपीएस बंद असल्याने घंटागाड्याववर वाॅच ठेवण्यासाठी यंत्रणा तोकडी पडत आहे.
घंटागाड्यांमध्ये कचरा गोळा केल्यानंतर पालिका प्रशासनाकडे त्याचा अहवाल पाठविण्यात येतो. जीपीएस बंद असल्याने प्रत्यक्ष गाडी पोहचली की नाही, हे पाहणे कठीण आहे.
जमा केलेल्या कचऱ्याचे विलगीकरण करून प्रक्रिया
बुलडाणा शहरातील कचरा दिवसाला १९ मेट्रिक टन निघतो. हा सर्व कचरा गोळा केल्यानंतर शहरानजीकच्या हनवतखेड येथील डम्पिंग ग्राउंडवर टाकला जातो. त्यानंतर त्या कचऱ्याचे विलगीकरण करण्यासाठी काही कामगार काम करतात.
कचरा विलगीकरणानंतर त्यावर प्रक्रिया करण्याच्या हालचाली सध्या सुरू आहेत. लोखंड, प्लॅस्टिक, रद्दी हा कचरा वेगळा केल्यानंतर कामगारांकडून त्याची विक्री करण्यात येते.
घंटागाडी आल्यानंतर वॉर्डातील नागरिकांच्या घेतल्या जातात सह्या
कचरा गोळा करण्यासाठी घंटागाडी आल्यानंतर चालकाकडून त्या वॉर्डातील कचरा टाकणाऱ्या व्यक्तीची सही घेतल्या जाते. त्यानुसार दिवसाला किती नागरिकांनी कचरा जमा केला याची माहिती पालिकेकडे उपलब्ध होते. प्रत्येक वॉर्डामध्ये नागरिकांच्या सह्या घेण्याचा उपक्रम सुरू आहे.