बुलडाणा, दि. २१- जिल्हा परिषदेच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच बुलडाणा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकला. राष्ट्रवादीला सोबत घेऊन भाजपने सत्ता स्थापन केली असून, अध्यक्षपदी भाजपच्या उमा तायडे, तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंगला रायपुरे यांची निवड करण्यात आली. जिल्हा परिषदेतील सभागृहात मंगळवारी दुपारी पार पडलेल्या निवड प्रक्रियेत अध्यक्ष पदाच्या उमेदवार उमा तायडे यांना ३४ तर काँग्रेसच्या यशोदा चोपडे यांना २६ मते मिळाली. जिल्हा परिषदेत निवडणुकीत कुणालाही स्पष्ट बहुमत मिळाले नसल्याने, गत पंधरा दिवसांपासून सत्ता स्थापन करण्याकरिता प्रत्येक पक्षाचे प्रयत्न सुरू होते. ६0 जागांपैकी भाजपला सर्वात जास्त २४ तर काँग्रेस १४, शिवसेना १0, राष्ट्रवादी काँग्रेस आठ, भारिप दोन आणि दोन अपक्ष विजयी झाले. सत्ता स्थापनेकरिता ३१ सदस्यांची गरज होती. त्यामुळे भाजपने राष्ट्रवादीला सोबत घेऊन सत्ता स्थापन केली. दुसरीकडे काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्न झाले; मात्र राष्ट्रवादीचे नेते माजी कॅबिनेटमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. मंगळवारी दुपारी १२ वाजता भाजपच्या उमा तायडे यांनी अध्यक्ष पदासाठी तर राष्ट्रवादीच्या मंगला रायपुरे यांनी उपाध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केला, तसेच काँग्रेसच्या वतीने यशोदा चोपडे यांनी अध्यक्ष पदासाठी तर शिवसेनेच्या सुनंदा भोजने यांनी उपाध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केले. ३४ विरुद्ध २४ मतांनी उमा तायडे यांची अध्यक्षपदी तर मंगला रायपुरे यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. भाजपचे २४ सदस्य असून, त्यांना एका अपक्षाने पाठिंबा दिला, तसेच राष्ट्रवादीचे आठ सदस्य असून, त्यांना एका अपक्षाने पाठिंबा दिला. भारिपने भाजपच्या विरोधात मतदान केले. जिल्हा परिषद अध्यक्षपदी तायडे व उपाध्यक्षपदी रायपुरे यांची निवड झाल्याचे जाहीर होताच ढोल-ताशांच्या गजरात कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
बुलडाणा जि. प.वर पहिल्यांदाच भाजपचा झेंडा
By admin | Updated: March 22, 2017 02:05 IST