अधुनिक युगात मातीच्या तव्याची क्रेझ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2020 12:13 PM2020-10-11T12:13:29+5:302020-10-11T12:14:10+5:30
Buldhana News मातीच्या भांड्यातील भाजी किंवा तव्यावरील पोळी तथा भाकरीला विशिष्ट चव येत असल्याचे खवय्यांचे म्हणणे आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा/डोणगाव: अधुनिक युगात स्वयंपाकासाठी मातीच्या तव्यासह मातीची भांडी वापरण्याकडे नागरिकांचा कल वाढत असल्याचे चित्र आहे. त्यातच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर न्युट्रीशीयन मिळविण्याच्या दृष्टीनेही ही भांडी उपयुक्त असल्याची नागरिकांची भावना बनल्यामुळे मातीच्या तव्याची क्रेझ आता वाढत आहे.
राजस्थानमधून मातीची भांडी आणि तवे तथा खेळणी विकण्यासाठी आलेल्या व्यक्तींकडून प्रामुख्याने तवा घेण्याकडे नागरिकांचा कल वाढत आहे. डोणगाव, चिखली, बुलडाण्यासह जिल्ह्यातील बहुतांश भागत सध्या हे अस्थायी विक्रेते फिरत आहेत. त्यांना सार्वत्रिक स्वरुपात काही प्रमाणात प्रतिसादही मिळत असल्याचे पोपललाल या विक्रेत्याने सांगितले.
राजस्थानातून ही भांडी प्रामुख्याने बुलडाणा जिल्ह्यात जालना जिल्ह्यातून रेल्वेमार्गे पोहोचत आहेत. मातीच्या भांड्यातील भाजी किंवा तव्यावरील पोळी तथा भाकरीला विशिष्ट चव येत असल्याचे खवय्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे या भांड्यांना आता मागणी वाढत आहेत. त्यातच मिशन बिगीन अगेन सुरू झाल्याने परराज्यातील हे मजूर तथा कामगार बुलडाणा जिल्ह्यात येवून रेडीमेड तयार असलेली ही मातीची भांडी व तवे विकत असल्याचे चित्र आहे.
मातीचे भांडे किंवा तवा हळुहळू गरम होतो. त्यामुळे त्यामध्ये शिजविण्यात आलेल्या अन्न पदार्थाला एक वेगळी चव येते. त्याचा स्वाद चांगला लागलतो. त्यामुळे प्रामुख्याने मातीचा तवा घेण्याकडे नागरिकांचा कल असतो. त्यास बुलडाणा येथील फिटनेस कोच नीलेश परदेशी यांनीही दुजोरा दिला. सोबतच यातून न्युट्रीशियन्स ही भेटतात, असे त्यांनी सांगितले. सोबतच गॅसवर शिजविलेल्या अन्नाची आणि चुलीवर शिजविलेल्या अन्नाची वेगळी चव लागते. गॅसचे आगीत रुपांतर होवून नंतर अन्न शिजते तर चुलीवर थेट आग ही अन्नाला मिळते, असे ते म्हणाले.
माती अल्कली धर्मीय
माती अल्कली धर्मीय आहे. त्यामुळे अन्नातील आम्लधर्मीय तत्वे तथा अॅसीड मारले जाते. सोबतच अन्न पचनास यामुळे मदत होते. तसेच मातीच्या भांड्यातील अन्न पदार्थाला तेलही कमी लागते. त्यातून फॅट्स वाढत नाही. सोबतच अन्न हे हळुहळु शिजते. त्यामुळे अन्नातील नैसर्गिक तत्व तथा घटक कायम टिकून राहतात. या व्यतिरिक्त मातीमध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम, आर्यन, सल्फर हे शरीरासाठी आवश्यक घटकही या माध्यमातून उपलब्ध होत असतात, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयातील फिजिशियन डॉ. विजय सोळंकी यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले. त्यातून ही क्रेझ वाढत असल्याचे एकंदरीत चित्र आहे.