बुलडाणा: लोक सहभागातून बुलडाणा शहरात सीसीटीव्ही लावण्याच्या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत असून पोलिस प्रशासनाने केलेल्या आवाहनानंतर नवरात्रोत्सवाताली दोन्ही गरबा फेस्टीवलच्या ठिकाणी नऊ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. या व्यतिरिक्त शहरातील अन्य काही मोक्याच्या ठिकाणीही सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यास प्राधान्य देत आहे. बुलडाणा शहर पोलिस ठाण्याचे ठाणेदार यु. के. जाधव यांच्या पुढाकारातून ही संकल्पना समोर आली आहे. त्यासंदर्भाने बुलडाणा पोलिस ठाण्यात मध्यंतरी शहरातील प्रतिष्ठीत नागरिक, डॉक्टरर्स, व्यावसायिकांच्या बैठकाही घेण्यात आल्या होत्या. त्यांतर आता प्रत्यक्षात या उपक्रमाच्या अंमलबजावणीस प्रारंभ झाला आहे. गुन्हेगारांना आळा घालण्यासोबतच त्यांच्यावर वचक ठेवण्यासाठी शहरातील महत्त्वाचे रस्ते, चौकात हे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत. पाच आॅक्टोबरला त्यासंदर्भाने बुलडाणा पोलिस ठाण्यात बैठक घेऊन तसे आवाहनच ठाणेदार यु. के. जाधव यांनी केले होते. परिणामस्वरुप सध्या १६ सीसीटीव्ही कॅमेरे हे मलकापूर रोड, धाड नाका, संगम चौक, जयस्तंभ चौक येथे बसविण्याची प्रक्रिया सुरू आहे. या व्यतिरिक्त १६ कॅमेरे हे कल्पतरू कॉम्प्लेक्स, दोन कॅमेरे डॉ. बोथरा डायगनोस्टीक व दोन कॅमेरे गर्दे हॉल परिसरात बसविण्यात आले असल्याचे पोलिस निरीक्षक यु. के. जाधव यांनी सांगितले आहे. गेल्या काही काळात शहरात गुन्हेगारीने डोके वर काढले होते. त्यानुषंगाने गुन्हेगारांवर वचक बसावा तथा गुन्ह्यांच्या तपासात पोलिसांनाही मदत व्हावी, ही दुहेरी भूमिका ठेऊन लोकसहभागातून हा उपक्रम बुलडाणा शहरात प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येत आहे. त्याचे सकारात्मक परिणामही आता समोर येत आहेत.
बुलडाण्यावर तिसऱ्या डोळ्याचा पहारा ; गरबा फेस्टीवलवर ९ सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 18:01 IST