लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: उत्तर प्रदेश मधील चित्रकुट येथे २० फेब्रुवारी रोजी झालेल्या शेतकरी उत्पादक कंपनीच्या कृषी प्रदर्शनीत बुलडाणा जिल्ह्याचा सहभाग दिसून आला. तळणी येथील शेतकरी दिलीप नाफडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेशी प्रत्यक्ष संवाद साधून महाराष्ट्रीय टोपी व रुमाल घालून त्यांचा सत्कार केला.उत्तर प्रदेश मधील चित्रकुट येथे १० हजार शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्याच्या भारत सरकारच्या महत्वाकांक्षी योजनेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी भारतातील चांगले काम करणाऱ्या १५ शेतकरी उत्पादक कंपन्यांना आमंत्रित करण्यात आले होते. यामध्ये कृषी मंत्रालय भारत सरकार द्वारा मलकापूर येथील जय सरदार शेतकरी उत्पादक कंपनीला सुद्धा आमंत्रित केले होते. कार्यक्रम स्थळी या उपक्रमाची माहिती देण्यासाठी स्टॉल लावण्याची संधी देण्यात आली होती. योजनेच्या शुभारंभानंतर नरेंद्र मोदी यांनी जय सरदार शेतकरी उत्पादक कंपनीच्या स्टॉलला भेट दिली. यावेळी तळणी येथील शेतकरी दिलीप नाफडे, माकोडी येथील शेतकरी सुनील चोपडे व मलकापूर येथील कृषी विकास संस्थेचे प्रकल्प समन्वयक रवी पाटील यांनी पंतप्रधान यांना कंपनीने विकसित केलेल्या उत्पादनाची माहिती दिली. कंपनीच्या माध्यमातून परिसरातील शेतकऱ्यांचा कसा फायदा होत आहे व देशभरातील इतर भागात सुद्धा शेतकºयांना या प्रकारच्या कंपन्या उभ्या करण्यासाठी आपणा कश्या प्रकारे सहकार्य करीत आहोत याविषयी अधिक माहिती दिली.जवळपास दोन वर्षापूर्वी तळणी येथील शेतकरी दिलीप नाफडे यांनी ‘मन की बात’मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेशी विडीओ कॉन्फरन्स संवाद साधला होता. आता २९ फेब्रुवारी रोजी चित्रकुट येथे त्यांना प्रत्यक्ष मोदींना भेटायची संधी मिळाली. या प्रसंगी भारतातील अनेक खासदार, अधिकारी, प्रगतीशील शेतकरी, नाबार्डचे अधिकारी, राष्ट्रीय सहकारी विकास बोर्डचे अधिकारी उपस्थित होते.
उत्तर प्रदेशातील कृषी प्रदर्शनात बुलडाणा जिल्ह्याचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2020 3:00 PM