अकोला: यूती आणि आघाडीतील घटस्फोटामुळे झालेले मतविभाजन आणि काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या बंडखोरीचे परिणाम पश्चिम वर्हाडातील अकोला, बुलडाणा आणि वाशिम या तिन्ही जिल्ह्यातील मतदारसंघांच्या निकालावर दिसून आले. तिन्ही जिल्ह्यातील १५ पैकी ९ मतदारसंघांवर भाजपने ताबा मिळवला. काँग्रेसला तीन मतदारसंघांमध्ये, तर शिवसेनेला दोन मतदारसंघांवर विजय मिळवता आला. राष्ट्रवादी काँग्रेसचा या भागातून सफाया झाला असून, भारिप-बहूजन महासंघाला केवळ एका जागेवर विजय मिळवता आला. अकोला जिल्ह्यातील पाचपैकी चार मतदारसंघांमध्ये विजयश्री मिळवून भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. आकोटमध्ये प्रकाश भारसाकळे यांनी काँग्रेसचे महेश सुधाकर गणगणे यांचा ३१४११ मतांनी पराभव केला. भारसाकळे यांना जिल्ह्यात सर्वाधिक मताधिक्य मिळाले. भारिप-बमसंने बाळापूरचा गड कायम राखला. बळीराम सिरस्कार यांनी तिरंगी लढतीत काँग्रेसचे सै. नातिकोद्दिन खतीब आणि भाजपचे तेजराव थोरात यांना पराभूत केले. अकोला पश्चिममध्ये गोवर्धन शर्मा सलग पाचव्यांदा विजयी झालेत. त्यांनी ६६९३४ मतं मिळवून राकाँचे विजय देशमुख यांच्यावर ३९९५३ मतांनी विजय मिळविला. अकोला पूर्वमध्ये भाजपचे रणधीर सावरकर यांनी भारिप-बहुजन महासंघाचे विद्यमान आमदार हरिदास भदे यांच्यावर २४४0 मतांनी निसटता विजय मिळविला. मूर्तिजापूरमध्ये आमदार हरीश पिंपळे यांनी भाजपचा गड दुसर्यांदा राखला. वाशिम जिल्ह्यातील वाशिम आणि कारंजा, या दोन मतदारसंघांत भाजपने विजय मिळवला असून, भाजपच्या लाटेतही काँग्रेसने रिसोड मतदारसंघावरील वर्चस्व कायम ठेवले आहे. वाशिम मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार लखन मलिक यांनी पुन्हा एकदा बाजी मारली. कारंजा मतदारसंघाची निवडणूक यावेळी लक्षवेधी ठरली. शिवसेनेचे माजी आमदार राजेंद्र पाटणी हे या मतदारसंघातून भाजपतर्फे निवडणूक रिंगणात होते. मोदींची लाट आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोरीमुळे या मतदारसंघात राजेंद्र पाटणी यांना विजय मिळाला. रिसोड मतदारसंघावर काँग्रेसने आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. या मतदारसंघात यावेळीही काँग्रेसचे अमित झनक आणि भाजपचे विजय जाधव यांच्यातच खरी लढत झाली. जाधव यांचे कडवे आव्हान झनक यांनी लिलया पेलून, १५ हजारापेक्षा जास्त मतांनी विजय मिळवला. बुलडाणा जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल हे बदलत्या राजकारणाची नांदी ठरली आहे. दिलीपकुमार सानंदा, विजयराज शिंदे आणि धृपदराव सावळेंसह रेखाताई खेडेकर या दिग्गजांना पराभूत करून, मतदारांनी नव्या चेहर्यांना पसंती दिली आहे. जिल्ह्यातील सात मतदारसंघांपैकी तीन भाजप, तर काँग्रेस व शिवसेना प्रत्येकी दोन जागांवर विजयी झाली.
पश्चिम व-हाडावर भाजपचे वर्चस्व, राकाँचा सफाया
By admin | Updated: October 20, 2014 00:24 IST