लोकमत न्यूज नेटवर्क, सिंदखेडराजा (जि. बुलढाणा) : भाजप आमच्यासारख्या लहान पक्षांचा वापर करून नंतर सोडून देतो, हा आमचा अनुभव आहे. त्यामुळे आता युती, आघाडीच्या भानगडीत न पडता आगामी सर्व निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचा पुनरुच्चार राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते, माजी मंत्री महादेव जानकर यांनी येथे केला. मंगळवारी नांदुरा येथे जाताना ते शहरात थांबले. यावेळी 'लोकमत'शी बोलताना त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले.
लाडकी बहीण मदतीला धावून आली हे खरे असले तरीही मतदान यंत्रात दोष नव्हता, हे तितके स्पष्टपणे म्हणता येणार नाही, असे सांगून त्यांनी विरोधकांच्या सुरात सूर मिसळला. लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीत विशिष्ट समाजाचे मतदान एकवटले नाही. त्यामुळेच युती अफाट जागा मिळवून सत्तेत येऊ शकली. आता तितक्याच वेगाने विकास वाटेवर चालावे लागणार असल्याचे आव्हान त्यांच्यासमोर असेल, असे ते म्हणाले.