लोकमत न्यूज नेटवर्क, खामगाव: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गत काही कालावधीत घेतलेल्या भूमिकेमुळे सत्ताधार्याच्या पायाखालची वाळू सरकली आहे. भारतीय समाज आणि जनतेत राहुल गांधीमध्ये एक सक्षम पर्याय दिसून येत असल्याने सत्ताधार्यांनी राजकीय षडयंत्रातून राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली. ही बाब निषेधार्ह असून मोदींची प्रवृत्ती हिटलरशाहीला प्रोत्साहन देणारी असल्याचे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी येथे सांगितले.
खामगाव येथील शासकीय विश्राम गृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या पत्रकार परिषदेला काँग्रेस प्रदेश सचिव रामविजय बुरूगंले, शहर काँग्रेस कमेटीच्या अध्यक्षा सरस्वती खासने, तालुकाध्यक्ष मनोज वानखडे, शेगाव काँग्रेसचे शहराध्यक्ष विजय काटोले, महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा भारती पाटील, महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा सुरजीतकौर सलुजा, माजी नगरसेवक िकशोर आप्पा भोसले, इनायत उल्ला खान, युवक काँग्रेसचे अध्यक्ष रोहित राजपूत, संजय झुनझुनवाला, मंगेश इंगळे, श्रीकांत तायडे, विनोद मिरगे, निखिल देशमुख, प्रशांत टिकार, लक्ष्मण गवई,आदींची उपस्थिती होती.
सत्ताधार्याच्या मर्जीतील उद्योजक आणि नेत्यांचे मोठे घोटाळे उघडकीस आणल्यामुळे राहुल गांधी यांना लक्ष्य केले जात आहे. भांडवलदार उद्योगपतींच्या कर्ममापविरोधात त्यांनीआवाज उठविला आहे. भारतीय बँकांच्या थकबाकीदारांच्या लुटी विरोधात , एसबीआय एलआयसीच्या पैशांचा गैरवापर आदी घोटोळे त्यांनी उघडकीस आणले. संसदेत आवाज उठविला. भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून सामान्यांशी नाळ जोडण्याचा प्रयत्न चालविला. यामुळे पोटशूळ उठलेल्या सत्ताधार्यांनी त्यांची खासदारकी रद्द केली. इतकेच नव्हेतर द्वेषातून त्यांना बंगलाही खाली करायला लावला. ही बाब निषेधार्ह असल्याचेही सानंदा यांनी पत्र परिषदेत स्पष्ट केले.जय भारत सत्याग्रहाला सुरूवात
कॉग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधातील षडयंत्राविरोधात घरोघरी जनजागृती करण्यासाठी मंगळवारी खामगाव येथून जय भारत सत्याग्रहाला सुरूवात करण्यात आली. यावेळी मशाल पेटवित आगामी काळात संघर्ष करण्याचा निर्धार या पत्रकार परिषदेत माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी केला.
त्यांच्याबद्दल रोष नाही...पण त्यांची संगत चुकीची..!
खामगाव विधानसभा मतदार संघातील पराभूत उमेदवार ज्ञानेश्वर उपाख्य नाना पाटील यांचा उमेदवार म्हणून माजी आमदार दिलीपकुमार यांनीच शोध लावला. राणानानाची जोडी मतदार संघात चर्चेत येण्यापूर्वीच दोघांमध्ये बिनसले. आता दोन्ही नेत्यांमध्ये ताटातूट झाली. पत्रकार परिषदेत एका प्रश्नावर सानंदा यांना छेडले असता, त्यांनी त्यांच्याबद्दल रोष नाही, काँग्रेसशी त्यांचा काही संबंध नाही पण अलिकडे त्यांची संगत चुकली आहे. मोठे नेते असल्यानंतरही कार्यकर्त्यांच्या हक्कावर गदा आणणे त्यांना शोभणारे नाही.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"