पोफळी येथील मियावाकी प्रकल्पाचे केले कौतुक : समृद्ध गाव स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन
धामणगाव बढे : पाणी फाऊंडेशनचे सीईओ सत्यजित भटकळ यांनी मोताळा तालुक्यातील विविध गावांमध्ये २ फेब्रुवारी राेजी भेट दिली. यावेळी ग्रामस्थांशी संवाद साधून समृद्ध गाव स्पर्धेत सहभागी हाेण्याचे आवाहन केले.
सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत मोताळा तालुक्यातील अनेक गावांनी चांगली कामगिरी केली. आता पाणी फाऊंडेशन समृद्ध गाव स्पर्धेच्या निमित्ताने पुढचे पाऊल टाकले आहे. गावांचा शाश्वत विकास ही या स्पर्धेची मूळ संकल्पना आहे. यासाठी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन सत्यजित भटकळ यांनी केले. सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा अंतर्गत पोफळी येथे मियावाॅकी जंगल प्रकल्प साकारण्यात आला होता. त्याची पाहणी सत्यजित भटकळ यांनी केली. संपूर्ण विदर्भातील हा एकमेव प्रकल्प असल्याचे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले. मोताळा तालुक्यातील उर्हा, सिंदखेड, शेलापूर या गावांना त्यांनी भेटी दिल्या. सिंदखेड येथे आयोजित कार्यक्रमात तालुक्यातील जनुना, तिघरा, उबाळखेड, दाभा, कोऱ्हाळा बाजार, सिंदखेड येथील जल मित्रांसोबत त्यांनी संवाद साधला. सिंदखेड येथे शिवार फेरी, जलसंधारणाची कामे याविषयी माहिती घेतली. सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेमुळे आनंद, पाणी व आत्मविश्वास मिळाला. ती फक्त सुरुवात होती. अजून पुढे मोठे काम करायचे बाकी आहे. जनसहभाग व जनआंदोलनामुळे शक्य आहे, असे भटकळ यांनी सांगितले. प्रत्येक ठिकाणी गावकऱ्यांनी भटकळ यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले. सिंदखेड येथील कामाची माहिती प्रवीण कदम यांनी दिली. मोताळा तालुक्यातील २० गावांनी समृद्ध गाव स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला आहे. यावेळी पाणी फाऊंडेशनचे खान्देश समन्वयक सुखदेव भुसारी, विदर्भ समन्वयक सुभाष नानवटे, मोताळा तालुका समन्वयक ब्रह्मदेव गिऱ्हे, तांत्रिक समन्वयक सुमित गोरले, प्रभाग समन्वयक सचिन बोरसे, उमेदचे तालुका अभियान व्यवस्थापक संदीप जाधव उपस्थित होते.