लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूक संपताच खामगाव तालुक्यातील अडगाव येथे बुधवारी भानामतीच्या अघोरी पूजेचा धक्कादायक प्रकार समोर आला. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण असतानाच, वरिष्ठांकडून ससेमिरा लागल्याने खामगाव ग्रामीण पोलिसांमध्ये तारांबळ उडाल्याचे समजते.
भानामतीच्या पूजेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाकडून अडगाव येथे भेट देण्यात आली. काही नागरिकांना विचारपूस करण्यात आली. तसेच काहींची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी सदर पूजा एका समाजातील तेरवीची असल्याचा निष्कर्ष काढला. मात्र, गावातील पॅनेलची संख्या आणि ११ मडक्यांची पूजा हा योगायोग की हेतूपुरस्परपणे करण्यात आल्याची जोरदार चर्चा अडगाव आणि परिसरात आहे. याप्रकरणी चौकशी आणि पोलिसांच्या तपासावर सामान्य नागरिकांना संशय आहे.
चौकट...
ग्रामीण पोलिसांकडून स्थळ निरीक्षण!
भानामतीची पूजा करण्यात आलेल्या ठिकाणाची खामगाव ग्रामीण पोलिसांकडून बुधवारी रात्री तसेच गुरुवारी स्थळाचे निरीक्षण करण्यात आले. पूजा झालेल्या प्रकाराबाबत ग्रामस्थांकडे चौकशीही करण्यात आली.
* ग्रामीण पोलिसांकडून सारसासारव
-घडलेला प्रकार हा भानामती अथवा अघोरी पूजा नसल्याचे पोलिसांकडून सांगितल्या जात आहे. एका विशिष्ट समाजात मनुष्य वारला की तेरवीची अशी पूजा करण्याची पद्धत आहे, असे स्पष्टीकरण पोलिसांकडून दिले जात आहे.
-----------
चौकट...२
पराभूत उमेदवारांचे समुपदेशन करावे!
- अडगाव येथील अंधश्रद्धेच्या प्रकारामुळे ग्रामपंचायत निवडणुकीतील पराभूत उमेदवार तसेच ‘करणी’च्या धाकाने गावकऱ्यांचे मानसिक खच्चीकरण होण्याची भीती आहे. त्यामुळे अडीच हजार लोकसंख्या असलेल्या या गावातील सर्वांचे समुपदेशन करण्याची गरज असल्याचे महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष नरेंद्र लांजेवार यांनी ‘लोकमत’शी बोलतांना सांगितले.
कोट...
अडगाव येथील प्रकार घडलेल्या ठिकाणाची पाहणी केली आहे. परिसरात पारधी समाजाची नवीन वस्ती झाली आहे. या समाजातील एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर तेरवीची पूजा करण्यात आली आहे. नागरिकांनी घाबरून जाण्याचे काहीही एक कारण नाही. या घटनेवर पोलिसांचे सूक्ष्म लक्ष आहे.
- रफीक शेख
पोलिस निरीक्षक, खामगाव ग्रामीण.
-----------