लोकमत न्यूज नेटवर्क देऊळगाव राजा: विदर्भाचा तिरुपती बालाजी म्हणून लाखों भाविकांच्या हृदयात जागृत देवस्थान म्हणून स्थान असलेल्ल्या देऊळगाव राजातील श्री बालाजी महाराजांच्या यात्रा उत्सवाला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी एस. राममुर्ती यांनी परवानगी नाकारल्याने भाविकांच्या उत्साहावर विरजण पडले आहे. चारशे वर्षांपासून अखंडितपणे देऊळगाव राजा शहरात अश्विन कार्तिक महिन्यात बालाजी महाराज यात्रा महोत्सव भक्तिभावाने साजरा केला जातो, घटस्थापना, मंडपोत्सव, लळीत उत्सव आणि नंतर आठवडी बाजाराच्या जागेत भरणारी यात्रा हे सर्व उपक्रम यावर्षी आता साजरे करता येणार नाहीत.यासंदर्भात जिल्हाधिकारी यांनी गुरूवारी आदेश जारी करताना ३१ ऑक्टोबर पर्यंत जिल्ह्यात सर्व प्रकारचे सामाजिक, धार्मिक, मनोरंजन, सांस्कृतिकसह मोठ्या प्रमाणात गर्दी होणाऱ्या कार्यक्रमांवर बंदी घातली आहे. सोबतच १७ ऑक्टोबर ते १० डिसेंबर या कालावधीत साजरा होणारा बालाजी महाराज यात्रा महोत्सव स्थगित करण्याचे आदेश देत मंदिराच्या आतील भागात आवश्यक पुजा अर्चा व विधी पूर्ण करण्यासाठी फक्त दहा लोकांना परवानगी दिलेली आहे. जगाच्या पाठीवर कुठेही साजरा न होणारा एकमेव लळीत उत्सव येथे साजरा होतो. तोही यावर्षी होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
बालाजी महाराजांची यात्रा रद्द; चारशे वर्षांची परंपरा होणार खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2020 13:37 IST