बुलडाणा : शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या भादोला येथे सध्या अवैध दारु विक्रीला उधान आले आहे. दारुच्या व्यसनामुळे अनेकांचे संसार उध्दस्त झाले असून गावात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. दारुबंदीबाबत गावकर्यांनी ग्रामसभेत एकमुखी ठराव पारीत केला आहे. अवैधदारु विक्री केली जात असल्याने त्रस्त झालेल्या महिलांनी पुढाकार घेत आज २४ जून रोजी जिल्हा पोलिस अधिक्षक व जिल्हाधिकारी यांना निवेदन देत दारुबंदीची मागणी केली.भादोला येथे अवैध दारुविक्री जोमात सुरु आहे. त्यामुळे महिलांनी पुढाकार घेत दारुबंदीचा निर्णय घेतला. सरपंच संजय गवई, तंटामुक्तीचे अध्यक्ष राजुभाऊ मिसाळ यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकार्यांनी देखील महिलांच्या मागणीला पाठबळ देत गावात ग्रामसभा घेऊन दारुबंदीचा एकमुखी ठराव पारीत केला. ग्रामीण पोलिसांना वारंवार याबाबत सुचना व विनंती करुनही दारुबंदी होत नसल्याने अखेर ग्रामपंचायत पदाधिकारी व महिलांनी आज जिल्हा पोलिस अधिक्षक व जिल्हाधिकारी कार्यालय गाठून आपल्या समस्या मांडत अवैध दारुविक्री बंद करण्याची मागणी केली.
भादोल्यात दारु बंदीचा ठराव
By admin | Updated: June 26, 2014 02:04 IST