लोकमत न्यूज नेटवर्क पोरज : निम्न ज्ञानगंगा प्रकल्प-२ लघुपाटबंधारे योजनेतील प्रकल्पग्रस्तांचा मोबदला अद्यापही न मिळाल्याने २६ जानेवारीपासून शेतक-यांनी उपोषणास सुरुवात केली. त्यावर काहीच उपाययोजना होत नसल्याने शेतक-यांनी रविवारी प्रकल्पातून सिंचनासाठी सोडले जाणारे पाणी रोखण्याचा प्रयत्न केला. शेतक-यांच्या आंदोलनाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पाठिंबा देत जिल्हाध्यक्ष श्याम अवथळे यांनी त्यामध्ये सहभाग घेतला. प्रशासनाने उपोषणाची दखल न घेतल्यास उग्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. उपोषणकर्ते आक्रमक होत या प्रकल्पाचे पाणी रोखण्यासाठी गेटजवळ गेले असता त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. यावेळी आंदोलनकर्ते शेतकरी व पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. शेतकऱ्यांनी घोषणा देत पाणी बंद करू द्या, नाहीतर तीव्र आंदोलन करू, असा पवित्रा घेतला. पोलिसांनी उपोषणकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन करत खामगावच्या नायब तहसीलदार जगताप यांना बोलावले. जगताप यांनी शेतकऱ्यांसोबत चर्चा केली. मात्र, कुठलाही तोडगा न निघाल्याने तीव्र आंदोलन केले जाईल, असे सांगत देहत्याग करण्याचा इशाराही श्याम अवथळे यांनी दिला. तसेच त्यांनी स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांना माहिती दिली. तुपकर यांनी सायंकाळी ५ वाजेपर्यंत लघुपाटबंधारे विभाग बुलडाणाचे कार्यकारी अभियंता तुषार मेतकर व अभियंता खानझोडे त्या ठिकाणी येत असल्याचे सांगितले. आंदोलनात काळेगाव, रोहना, निमकवळा व दिवठाणा या गावातील महेंद्रसिंग राठोड, सुरेंद्र राठोड, रवींद्र राठोड, प्रल्हाद वाघमारे, प्रमोद निमकर्डे, रामेश्वर मुंडे, अमोल पाटील, आतिष पळसकर, नीलेश देशमुख, नीलेश गवळी यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
निम्न ज्ञानगंगा प्रकल्पाचे पाणी रोखण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2021 12:11 IST